ऑस्ट्रेलियाची संसद पुन्हा बदनाम! महिला खासदाराने केले लैंगिक शोषणाचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 04:21 PM2023-06-15T16:21:11+5:302023-06-15T16:21:41+5:30
सहकारी खासदार डेविड वान यांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गौप्यस्फोट थोर्पे यांनी केला होता. मात्र, त्यांना संसदेच्या नियमांमुळे भीतीने हे वक्तव्य मागे घ्यावे लागले होते.
ऑस्ट्रेलियाच्या महिला खासदाराने संसदेमध्ये तिचे लैंगिक शोषण झाल्याचा खळबळनक आरोप केला आहे. गुरुवारी अपक्ष खासदार लिडिया थोर्पे यांनी हा खुलासा केल्याने ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाची संसद महिलांसाठी कधीही सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सांगताना थोर्पे यांना अश्रू अनावर झाले होते.
संसदेत त्यांच्यावर अश्लिल बोलले जाते. त्यांना घेरण्याचाही प्रयत्न झाला. चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले गेले. प्रभावशाली लोकांनी त्यांच्यासोबत अभद्र व्यवहार केल्याचा आरोप थोर्पे यांनी केला आहे. सहकारी खासदार डेविड वान यांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गौप्यस्फोट थोर्पे यांनी केला होता. मात्र, त्यांना संसदेच्या नियमांमुळे भीतीने हे वक्तव्य मागे घ्यावे लागले होते. गुरुवारी त्यांनी पुन्हा वान यांच्यावर हे आरोप केले आहेत. डेविड हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी या आरोपांचे खंडन केले होते. मात्र, या आरोपांनंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे.
वान या प्रकरणी कायदेशीर तज्ञांची मते आजमावत आहेत. यामुळे त्यांना य़ा प्रकरणावर पुन्हा भाष्य करावे लागले आहे. त्यांनी अनेकदा माझा पाठलाग केला आहे. तसेच संसदेच्या आवारतच अनेकदा अश्लिल पद्धतीने स्पर्श केला आहे. यामुळे मला माझे कार्यालय सोडणे देखील भयावह वाटू लागले होते. मी ऑफिसचा दरवाजा खूप सावधतेने उघडत होते व आजुबाजुला कोणी नाही ना याची खात्री करूनच बाहेर प़डत होती. अनेकदा मला इतरांच्या मदतीने संसदेबाहेर पडावे लागले आहे, असा आरोप थोर्पे यांनी केला आहे.
२०२१ मध्येही ऑस्ट्रेलियन संसद सेक्स कांडामुळे बदनाम झाली आहे. ब्रिटनी हिंगिस यांनी त्यांच्या मंत्र्यावर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ही घटना २०१९ ची होती. या प्रकरणाची पाच वेळा चौकशी झाली होती. या चौकशांमध्ये ऑस्ट्रेलियन संसदेत लैंगिक शोषण आणि त्रास देणे हे नित्याचेच झाल्याचे समोर आले होते.