निर्वासितांसाठी आॅस्ट्रिया-जर्मनीने सीमा केल्या खुल्या
By admin | Published: September 6, 2015 10:27 PM2015-09-06T22:27:05+5:302015-09-06T22:27:05+5:30
हंगेरीहून येणाऱ्या हजारो निर्वासितांसाठी सीमा खुल्या केल्याची घोषणा आॅस्ट्रिया आणि जर्मनी यांनी केली आहे. सिरियातील यादवीमुळे हजारो निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे युरोपीय देशांच्या दिशेने येत आहेत
व्हिएन्ना : हंगेरीहून येणाऱ्या हजारो निर्वासितांसाठी सीमा खुल्या केल्याची घोषणा आॅस्ट्रिया आणि जर्मनी यांनी केली आहे.
सिरियातील यादवीमुळे हजारो निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे युरोपीय देशांच्या दिशेने येत आहेत. या निर्वासितांना हंगेरीतील सरकारने रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. आता या निर्वासितांना पहिल्यांदा बसगाड्यांनी व्हिएन्ना येथे आणण्यात येणार असून, तेथून रेल्वेने म्युनिक येथे आणले जाईल. शनिवारी सायंकाळी म्युनिक येथे ६ हजार निर्वासित आले. मध्यरात्रीपर्यंत त्यात आणखी दोन हजार निर्वासितांचे रेल्वेने आगमन झाले. या निर्वासितांसाठी म्युनिक येथे छावण्या उभारण्यात आल्या असून, तेथेच नोंदणी करून कपडे वगैरे दिले जात आहेत. बहुतेक निर्वासित म्युनिकमध्येच राहणार आहेत. आणखी निर्वासितांना घेऊन रेल्वेगाड्या येणार असल्याने ही संख्या वाढणार आहे.
या निर्वासितांच्या भाषेची अडचण ध्यानात घेऊन, अरबी भाषिक दुभाषकांकडून त्यांच्याशी संवाद साधला जात आहे.
या निर्वासितांना सीमेवरच रोखून धरण्याचा प्रयत्न हंगेरीने केला होता, त्यामुळे भयावह अवस्था निर्माण झाली होती. केवळ मानवीय आधारावर आम्ही निर्वासितांसाठी सीमा खुल्या केल्या आहेत, असे जर्मनीच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते हेरॉल्ड न्यूमन्स यांनी स्पष्ट केले.
युरोपीय देशांनी आश्रय घेण्यासाठी कडक नियम केले आहेत. त्यानुसार एखाद्याला आश्रय घ्यायचा असेल, तर प्रथम अर्ज करावा लागतो. या नियमास आम्ही बांधील असूनही मानवतेच्या आधारावर निर्वासितांना आश्रय देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. निर्वासितांना रोखून धरल्यामुळे हंगेरीला केवळ अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.