अचानक कोसळला बर्फाचा डोंगर, जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळाले लोक; पाहा धक्कादायक VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:00 PM2021-11-17T15:00:08+5:302021-11-17T15:03:38+5:30
नेपाळमध्ये घडलेल्या या हिमस्खलनाच्या घटनेत सात मुलांसह 11 जण जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली: सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा हिमस्खलनाचे व्हिडिओ पाहिले असतील. डोंगरावरुन कोसळणारा बर्फ अतिशय वेगाने येतो आणि त्याच्या समोर आलेल्या सर्व वस्तुंची नासधुस करुन जातो. अशाच प्रकारच्या भीषण हिमस्खलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था एएनआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, 30 मिनिटांच्या हिमस्खलनामध्ये सात विद्यार्थ्यांसह 11 जण जखमी झाले आहेत. मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी सांगितले की, हिमस्खलन झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जखमींपैकी बहुतांश स्थानिक शाळेतील विद्यार्थी आहेत. तुकुचे पर्वतावरुन हिमस्खलनाची सुरुवात झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेकांच्या किंचाळ्या ऐकू येत आहेत. तर, स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकजण धावतानाही दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ 14 नोव्हेंबर रोजी @mountaintrekking ने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडीओमधले हे दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडेल. व्हिडिओ शूट करणारी व्यक्तीही नंतर घाबरून पळू लागते.