KLF चा प्रमुख अवतार खांडाचा मृत्यू, भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्याचा होता सूत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:18 AM2023-06-15T11:18:42+5:302023-06-15T11:19:28+5:30
मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, मेडिकल रिपोर्ट अजून आला नाही.
खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) या दहशतवादी संघटनेचा स्वयंघोषित प्रमुख अवतार सिंग खांडा याचे आज बर्मिंगहॅम येथील सँडवेल रुग्णालयात निधन झाले. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात 19 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराचा तो मुख्य सूत्रधार होता. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, मेडिकल रिपोर्ट अजून आला नाही.
खांडा याला रणजोध सिंह या नावानेही ओळखले जाते. त्याला ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय हवा होता. कथित खलिस्तानच्या फुटीरतावादी चळवळीकडे शीख तरुणांना कट्टरतावादी बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याचे वडील कुलवंत सिंह खुखराना हे KLF दहशतवादी होते, वडिलांना 1991 मध्ये सुरक्षा दलांनी ठार केले होते.
ब्रिटनमधून मिळालेल्या माहितीनुसार, खांडाच्या समर्थकांना मेडिकल रिपोर्टमध्ये विषबाधा झाल्याचे सूचित करायचे आहे, जेणेकरून ते त्याला शहीद घोषित करू शकतील आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांवर हत्येचा आरोप करू शकतील. मात्र, खांदा ब्लड कॅन्सरने त्रस्त होता आणि त्याला सँडवेल आणि वेस्ट बर्मिंगहॅम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
राष्ट्रीय तपास संस्थेने 19 मार्च रोजी नियोजित आंदोलनादरम्यान लंडन उच्चायुक्तालयात भारतीय ध्वजाची विटंबना करणारा मुख्य आरोपी म्हणून खांदा याची ओळख पटवली आहे. दरम्यान, इतर खलिस्तानी सहानुभूतीदारांप्रमाणे खांदा हा विद्यार्थी व्हिसाद्वारे ब्रिटनमध्ये दाखल झाला आणि लगेच ब्रिटनमधील काही प्रमुख गुरुद्वारांमध्ये कार्यरत असलेल्या फुटीरतावादी दलामध्ये सामील झाला. या गुरुद्वारांचे व्यवस्थापन खलिस्तानी समर्थकांद्वारे केले जाते.