Moon Soil Plant: अफलातून प्रयोग! चंद्रावरून आणलेल्या मातीत उगवले रोपटे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:45 AM2022-05-14T06:45:38+5:302022-05-14T06:45:53+5:30
अमेरिकी शास्त्रज्ञांची ऐतिहासिक कामगिरी
वॉशिंग्टन : माणसासह प्राणिमात्रांना भूतलावर जगण्यासाठी पाणी आणि प्राणवायू यांची गरज असते. पृथ्वीप्रमाणेच ब्रह्मांडातही असे वातावरण असेल किंवा कसे, याचा शोध घेण्याचा मानवाचा प्रयत्न अव्याहत सुरू आहे. पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावर त्यासाठी अनेक मोहिमाही राबविण्यात आल्या. यातील एका मोहिमेत चंद्रावरून माती आणण्यात आली. या मातीत आता रोपटे उगविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.
काही वर्षांपूर्वी 'नासा'च्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्रावरुन ही माती आणली होती. चंद्रावरुन आणलेल्या मातीत पहिल्यांदाच रोपटं उगवण्यात त्यांना यश आले आहे. नासाच्या अपोलो मोहिमेतील सहा अंतराळवीर चंद्रावरून ३८२ किलो वजनाचे दगड घेऊन आले होते. हे दगड शास्त्रज्ञांना वाटण्यात आले.
फ्लोरिडा विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबर्ट फेरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नासाकडून १२ ग्रॅम माती मिळाली. इतक्या कमी मातीत काम करणे खूप अवघड होते, पण अखेरीस यश मिळाले. (वृत्तसंस्था)
असा केला प्रयोग...
n चंद्रावरच्या मातीला
रेगोलिथ असे म्हटले जाते. मातीचे चार वेगवेगळ्या भागात विभाजन करून त्यात पाणी आणि पोषक घटक असलेले द्रव्य शास्त्रज्ञांनी मिसळले.
n यानंतर त्यात अर्बिडोप्सिसच्या बिया टाकल्यानंतर काही दिवसांतच कुंडीत लहान रोपटे उगवले.
n रोपाविषयीची सविस्तर माहिती ‘जर्नल ऑफ कम्युनिकेशन्स बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.