B 21 Raider: अमेरिकेनं बनवलं 'असं' घातक शस्त्र, जे कुठल्याही देशात जाऊन करू शकतं हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 05:19 PM2022-05-29T17:19:10+5:302022-05-29T17:19:46+5:30
पहिलं अधिकृत उड्डाण कॅलिफोर्नियाच्या एअरफोर्सच्या बेसवर करण्यात येईल. डिसेंबर २०२१ मध्ये या बॉम्बरचं उड्डाण व्हावं यासाठी अमेरिकन एअरफोर्स प्रय़त्नशील होती
कॅलिफोर्निया - अमेरिकेनं आणखी एक घातक शस्त्र बनवलं असून पुढील वर्षी २०२३ मध्ये बॉम्बर बी २१ रेडर(B-21 Raider) उड्डाण घेण्यासाठी सज्ज आहे अशी माहिती नॉर्थोप ग्रुमन नावाच्या कंपनीनं दिली आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत या शस्त्राचं प्रदर्शन जनतेसमोर केले जाईल. या शस्त्राबद्दल लोकांना माहिती दिली जाईल. अद्याप काही चाचण्या बाकी आहेत. लवकरच त्या पूर्ण होतील. हे अमेरिकी बॉम्बर बी-२ चं अपग्रेडेड व्हर्जन आहे.
कॅलिफोर्नियाच्या पामडेल येथील एअरफोर्सच्या प्लांटवर बी-२१ रेडर बॉम्बरनं सर्व ग्राऊंड टेस्ट पूर्ण केल्या आहेत. लोड्स केलिब्रेशन टेस्ट हा यातील महत्त्वाचा टप्पा आहे. डिफेन्स न्यूजनुसार, लोड्स कॅलिब्रेशन टेस्टमध्ये विमानाच्या सर्व भागांची तपासणी केली जाते. त्याचा ढाचा आणि टिकाऊपणाबद्दल आढावा घेतला जातो. यावेळी अनेक प्रकारच्या दबाव प्रक्रियेतून त्याला पार व्हावं लागतं. नॉर्थोप ग्रुमन कंपनी सध्या ६ बॉम्बरची निर्मिती करत आहे. त्याचसोबत त्याची चाचणीही करण्यात येत आहे.
कंपनीने यावर्षी मार्च महिन्यात घोषणा केली होती की, या विमानाचे सर्व ग्राऊंड टेस्ट सुरू होणार आहेत. आता पहिल्या उड्डाणाआधी त्याचे इंजिन टेस्ट केले जाईल. त्यानंतर हायस्पीड टेस्ट होईल. पहिलं अधिकृत उड्डाण कॅलिफोर्नियाच्या एअरफोर्सच्या बेसवर करण्यात येईल. डिसेंबर २०२१ मध्ये या बॉम्बरचं उड्डाण व्हावं यासाठी अमेरिकन एअरफोर्स प्रय़त्नशील होती. परंतु त्यात बदल झाल्यानंतर २०२२ मध्यापर्यंत उड्डाण होईल असं सांगितले जात होते. परंतु आता काही तांत्रिक कारणामुळे चाचण्यांमुळे ही उड्डाण पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे.
अमेरिकन एअरफोर्स अथवा उत्पादन करणारी कंपनी नॉर्थोप ग्रुमनने या बॉम्बरच्या वैशिष्ट्याबाबत जास्त खुलासा केला नाही. परंतु हा लांबचं अंतर पार करणारा स्ट्रेटेजिक स्टेल्थ बॉम्बर आहे. यात थर्मोन्यूक्लिअर शस्त्र घेतलं जाऊ शकतं. त्याचा हेतू जासूसी, युद्धात हल्ला करणं आणि विमानाला इंटरसेप्ट करणं हे आहे. यूएस एअरफोर्स ग्लोबल स्ट्राइक कमांडला १०० बी २१ रेडर बॉम्बरची आवश्यकता आहे.