बाबासाहेबांचे लंडनमधील स्मारक युवकांचे प्रेरणास्थान; विजय दर्डा, देशमुख, भन्साळी यांची आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:28 AM2018-07-03T04:28:33+5:302018-07-03T04:28:46+5:30
लंडन : ‘मला आज परमपूज्य बाबासाहेबांच्या लंडनमधील निवासस्थानाचे दर्शन घेता आले, हे मी माझे सौभाग्य समजतो. बाबासाहेबांविना हा देश, हा समाज कसा असता? विचार करा!’ अशा भावना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी लंडनच्या १०, किंग्ज हेन्री रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिल्यानंतर तेथील अभ्यागत पुस्तिकेत व्यक्त केल्या.
‘बाबासाहेब भारतात जन्मले, हे या देशाचे भाग्य आहे. १२० कोटी जनतेचा सच्चा प्रतिनिधी असल्याचा धर्म पाळल्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. हे स्मारक अनंत-अनंत युवकांचे प्रेरणास्थान बनेल. महान राष्टÑनिर्मितीच्या दिशेने उचललेले ते एक पाऊल ठरेल,’ असे विजय दर्डा यांनी या अभिप्राय पुस्तिकेत नमूद केले.
या भेटीदरम्यान माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख आणि मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष किरीट भन्साळी हेही विजय दर्डा यांच्यासोबत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२१-२२ मध्ये याच निवासस्थानी राहून ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मधून उच्च शिक्षण घेतले होते, हे येथे उल्लेखनीय आहे. ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) सामाजिक न्यायाचा योद्धा, येथे १९२१-२२ या काळात वास्तव्याला होते,’ असा मजकूर या स्मारकाच्या बाहेर एका निळ्या पाटीवर लिहिलेला आहे.
या स्मारकात बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित त्यांच्या वापरातील अनेक वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यात ‘जनता’(द पीपल) या पाक्षिकाच्या अंकाचा समावेश आहे. डॉ. आंबेडकरांनी १९३० मध्ये त्याचे प्रकाशन केले होते. बाबासाहेबांनी पाक्षिकाच्या रूपात सुरू केलेली ही तिसरी पत्रिका कालांतराने साप्ताहिक बनली होती. बाबासाहेब ‘जनता’चे पहिले संपादक होते. या संग्रहालयात १८ फेब्रुवारी १९३३ चे एक ऐतिहासिक पत्रही ठेवले आहे. हे पत्र बाबासाहेबांनी महात्मा गांधी यांना लिहिले होते. या पत्रात बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा संवेदनशील मुद्दा उपस्थित केला आहे. याशिवाय स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या छायाचित्रासह भारतीय इतिहासातील अनेक आठवणी जतन करून ठेवलेल्या आहेत.