गर्भात असताना गोळी लागूनही बाळ जिवंत
By admin | Published: July 5, 2017 02:18 PM2017-07-05T14:18:22+5:302017-07-05T14:18:22+5:30
आईच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाला रस्त्यावर सुरू असलेल्या गोळीबारात गोळी लागल्याची घटना ब्राझीलमध्ये घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रिओ डी जेनेरियो, दि. 5- आईच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाला रस्त्यावर सुरू असलेल्या गोळीबारात गोळी लागल्याची घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. त्या बाळाला आईच्या पोटात असताना गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. या नवजात जीवाला गोळी लागूनही तो जिवंत राहिल्याने डॉक्टरसुद्धा आश्चर्य व्यक्त करत आहेत. आत्तापर्यतच्या करिअरमध्ये अशी घटना पहिल्यांदा पाहत असल्याचं डॉक्टरांनी म्हंटलं आहे. "द इन्डेपेन्डंट"ने हे वृत्त दिलं आहे. त्या मुलाला वाचवण्याचे सगळे प्रयत्न हॉस्पिटलमधील डॉक्टर्स करत आहेत.
या नवजात बाळाचं नावं आर्थर ठेवण्यात आलं आहे. 30 जून रोजी रिओ शहरात रस्त्यावर झालेल्या गोळीबारात क्लॉडिनेया या महिलेला गोळी लागली होती. त्यांना जेव्हा गोळी लागली तेव्हा त्यांना आठवा महिना सुरू होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर शस्त्रक्रियाकरून बाळाला बाहेर काढण्यात आलं. गोळी लागल्याने आर्थरच्या फुफ्फुस आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसंच शरीराच्या खालच्या भाग पॅरालाइज झाला आहे. इतकी गंभीर दुखापत होऊन त्या नवजात बाळाचं जगणं कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. मशीनच्या साहाय्याने आर्थर श्वास घेतो आहे. त्याला वाचविण्याचे सगळे प्रयत्न केले जात आहेत.
अॅमनेस्टी इंटरनॅशनल ब्राझीलनुसार, रिओमध्ये दिवसाला 13 गोळीबाराच्या घटना घडतात. ही गेल्या 11 महिन्यांची आकडेवारी आहे. गोळीबाराच्या जास्त घटना झोपडपट्टी असलेल्या भागात घडतात. जिथे ड्रग्ज माफिया राहतात. ज्या दिवशी क्लॉडिनेया आणि तिच्या गर्भात असलेल्या बाळाला गोळी लागली होती त्याचवेळी एका आई आणि मुलीचा त्या गोळीबारात मृत्यू झाला होता. दरवाज्यात उभी असलेल्या 76 वर्षीय मारिया यांना पहिली गोळी लागली होती. त्यांना वाचवायला त्यांची 42 वर्षीय मुलगी अॅना क्रिस्टिना बाहेर आल्यावर तिलाही गोळी लागली. यामध्ये त्या माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला.
आणखी वाचा
धक्कादायक ! मृत घोषित करण्यात आलेलं नवजात बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत
चीनला इशारा - भारत, अमेरिका व जपानच्या युद्धनौकांचा संयुक्त सराव
पश्चिम बंगाल धगधगतोय....एका फेसबूक पोस्टमुळे जातीय हिंसाचार