भारतीय पर्यवेक्षकांकडून मिळते वाईट वागणूक, कॉग्निझंटविरुद्ध अमेरिकी कर्मचाऱ्यांची न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:07 AM2018-03-20T00:07:30+5:302018-03-20T00:07:30+5:30
सर्वांत मोठी एच १-बी व्हिसा प्रायोजक कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पच्या काही अमेरिकी कर्मचाºयांनी कंपनीविरुद्ध कोर्टात धाव घेतली असून, भारतीय पर्यवेक्षकांकडून भेदभावकारक वागणूक मिळाल्याने आपल्या कामाचे योग्य मूल्यमापन होत नसून परिणामी आपल्याला कामावरून काढल्याचा आरोप केला आहे.
ब्लूमबर्ग : सर्वांत मोठी एच १-बी व्हिसा प्रायोजक कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पच्या काही अमेरिकी कर्मचाºयांनी कंपनीविरुद्ध कोर्टात धाव घेतली असून, भारतीय पर्यवेक्षकांकडून भेदभावकारक वागणूक मिळाल्याने आपल्या कामाचे योग्य मूल्यमापन होत नसून परिणामी आपल्याला कामावरून काढल्याचा आरोप केला आहे.
भारतीय नसलेल्या कर्मचा-यांना कंपनीत वाईट वागणूक दिल्याचा आरोपही कर्मचा-यांनी याचिकेत केला आहे. कंपनीने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तीन माजी कर्मचा-यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, आपले पर्यवेक्षक (सुपरवायझर) व सहकारी भारतीय होते. त्यांनी आमची कामगिरी मुद्दाम कमी दर्जाची दाखवून आम्हाला पदोन्नती नाकारली, तसेच नंतर आम्हाला कामावरून काढून टाकले. कंपनीने म्हटले की, हे प्रकरण अमेरिकेच्या केंद्रीय नागरी हक्क कायद्यात बसत नाही. १९६४ च्या कायद्याने वांशिक भेदभावास बंदी आहे. याचिकाकर्त्या कर्मचाºयांनी केलेला भेदभावाचा आरोप देशाशी संबंधित आहे, वंशाशी नव्हे. तक्रारकर्त्यांनी व्हिसाधारकांना लक्ष्य केल्याचे दिसते.
ही याचिका अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणाचा परिपाक आहे, असे जाणकार सांगतात. हे दावे कोणत्याही सुनावणीविनाच फेटाळण्याची विनंती कॉग्निझंटने केली आहे.
सर्वाधिक व्हिसा
गेल्या वर्षी कॉग्निझंटला सर्वाधिक २९ हजार एच १-बी व्हिसा मिळाले. दुसºया स्थानावरील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट व गुगल आयएनसी यांना मिळालेल्या व्हिसाची संख्या ५ हजारांपेक्षाही कमी आहे. टीसीएस व विप्रो यासह आणखी दोन आयटी कंपन्यांविरुद्धही अमेरिकेतील कर्मचाºयांनी विविध ठिकाणी असेच खटले भरले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या ठिकाणच्या प्रकरणात एकच विधि संस्था कर्मचाºयांच्या वतीने बाजू मांडत आहे.