हवाई हल्ल्यात इसिसचा म्होरक्या अल बगदादी ठार ?
By admin | Published: June 14, 2016 12:45 PM2016-06-14T12:45:03+5:302016-06-14T13:33:58+5:30
ओसामा बिन लादेननंतर क्रूर दहशतवादी म्हणून ओळख निर्माण करणारा इसिसचा प्रमुख म्होरक्या अबू बाकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रक्का, दि. १४ - ओसामा बिन लादेननंतर क्रूर दहशतवादी म्हणून ओळख निर्माण करणारा इसिसचा प्रमुख म्होरक्या अबू बाकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. सिरीयामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. उत्तर सिरीयामध्ये इसिसचा बालेकिल्ला असलेल्या रक्कामध्ये जोरदार हवाई हल्ला झाला.
त्यामध्ये बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिका किंवा अन्य कुठल्याही देशाने या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. इराण आणि तुर्कीश वर्तमानपत्र येनिस सफाकने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. इसिसचा खलिफा बगदादी रविवारी झालेल्या हल्ल्यात ठार झाला असे अल अमाक्यू वृत्तसंस्थेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
रमजानच्या पाचव्या दिवशी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मोसूलपासून ६५ कि.मी. अंतरावर हल्ल्यामध्ये बगदादी जखमी झाल्याचे वृत्त 'अल सुमारीया' या इराकी टीव्ही वाहिनीने दिले आहे. डोक्यावर अडीचकोटी डॉलरचे इनाम असलेला बगदादी मागच्या सहा महिन्यांपासून ठिकाणे बदलत असून तो मोसूलला आल्याचे वृत्त सीएनएन या अमेरिकन वाहिनीने संरक्षण अधिका-यांच्या हवाल्याने दिले होते.