"बाहुबली 2" ची पाकिस्तानातही धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 05:08 PM2017-05-18T17:08:55+5:302017-05-18T17:08:55+5:30
भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणा-या एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणा-या एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही या सिनेमासाठी जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाची नेपाळमध्ये धूम पाहायला मिळत असल्याचं वृत्त आलं होतं त्यानंतर आता पाकिस्तानमध्येही या सिनेमाने बंपर ओपनिंग मिळवलं आहे. डेक्कन क्रोनिकलच्या वृत्तानुसार, पहिल्या आठवड्यातच बाहुबलीने साडेचार कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हा सिनेमा पाकिस्तानमध्ये 100 स्क्रीन्सवर झळकला आहे. विशेष म्हणजे सुरूवातीला पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला परवानगी दिली नव्हती. मात्र, नंतर एकही कट न सुचवता, ‘यू’ प्रमाणपत्रासह बाहुबली 2 हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाला आहे. पाकिस्तानचे सिने वितरक अमजद रशिद यांनी या सिनेमाला आणि सिनेमातील स्पेशल इफेक्ट्सला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं आहे.
या चित्रपटाच्या कथानक हिंदू पुराण आणि परंपरांवर आधारीत असूनही पाकिस्तानातील प्रेक्षकांच्या हा सिनेमा पसंतीस पडत आहे. बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे.
बाहुबली 2 च्या निर्मात्यांना ब्लॅकमेल करणा-या 6 जणांना अटक-
बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करणा-या सहा जणांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. करण जोहर आणि निर्मात्यांना चित्रपटाची पायरटेड कॉपी वितरित करण्याची धमकी दिली होती. अटक केलेल्या आरोपींमध्ये बिहारमधल्या सिनेमाहॉलच्या मालकाचा समावेश आहे.
इंटरनेटवर पायरटेड कॉपी अपलोड न करण्यासाठी त्यांनी 15 लाखांची मागणी केली होती अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश मोहांती यांनी दिली. 29 एप्रिलला या प्रकरणी निर्मात्यांनी तक्रार दाखल केली. राहुल मेहता नावाच्या व्यक्तीने निर्मात्यांशी संपर्क साधला आणि हाय डेफिनेशन कॉपी उपलब्ध असल्याचे सांगितले. मेहताने त्यांना नमुना व्हिडीओ सुद्धा दाखवला. त्याने पैशांची मागणी केली. निर्मात्यांनी त्याच्याबरोबर चर्चा करुन त्याला खेळवत ठेवले व पोलिसांना माहिती दिली.
हैदराबादच्या ज्युबली हिल्सच्या भागातून 11 मे रोजी राहुल मेहताला अटक केली. त्याने जितेंद्र मेहता, तौफीक आणि मोहम्मद अली यांची नावे दिली. तिघांना दिल्लीतून अटक करण्यात आली. जितेंद्र आणि तौफीक यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. बाहुबलीच्या पहिल्या भागाची पायरसी केल्या प्रकरणी त्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली होती. बिहारमधील बेगुसराय येथील सिनेमाहॉलचा मालक दीवाकर कुमार आणि चंदन या दोघांनाही पोलिसांनी पाटणा येथून अटक केली. मोनू नावाचा आरोपी फरार आहे. दीवाकरने चित्रपटाची डिजिटल कॉपी बनवली असे पोलिसांनी सांगितले.