पाकचा ‘बजरंगी भाईजान’!

By admin | Published: August 2, 2015 03:47 AM2015-08-02T03:47:43+5:302015-08-02T03:47:43+5:30

सध्या पाकिस्तानातील चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफुल्ल’ सुरू असलेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या कथानकावरून स्फूर्ती घेऊन तेथील मानवतावादी कार्यकर्त्यांनी

'Bajrangi Bhaijaan' of Pakistan! | पाकचा ‘बजरंगी भाईजान’!

पाकचा ‘बजरंगी भाईजान’!

Next

कराची : सध्या पाकिस्तानातील चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफुल्ल’ सुरू असलेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या कथानकावरून स्फूर्ती घेऊन तेथील मानवतावादी कार्यकर्त्यांनी गेली १५ वर्षे त्या देशात अडकून पडलेल्या एका मूक-बधिर भारतीय हिंदू मुलीच्या पालकांचा नव्याने शोध घेण्याचे ठरविले आहे.
या मुलीचे खरे नाव काय हे कोणालाच माहीत नसल्याने तिचा सांभाळ करणाऱ्या कराचीमधील मानवी हक्क कार्यकर्त्या बिल्किस एधी यांनी तिला ‘गीता’ असे नाव ठेवले आहे. ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान खान, असंख्य अडचणींवर मात करीत, दिल्लीच्या दर्ग्यात हरवलेल्या मुन्नी या पाकिस्तानी मूक-बधिर मुलीला अखेर तिच्या आईचा शोध घेऊन तिच्या हवाली करतो. त्या कथानकातील पात्र व धर्माची अदलाबदल करून पाकिस्तानातील ‘बजरंगी भाईजान’ गीताच्या बाबतीतही तेच मानवतावादी काम करीत आहेत.
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या यशामुळेच गीताच्या पालकांचा भारतात शोध घेण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाले असल्याची कबुली पाकिस्तानमधील आघाडीचे मानवी हक्क कार्यकर्ते व त्याच खात्याचे तेथील केंद्रीय मंत्री अन्सार बर्नी यांनी दिली. खरेतर, आपण गीताचे आई-वडील शोधण्यासाठी २०१२ मध्ये जे प्रयत्न केले त्यावरच ‘बजरंगी भाईजान’चे कथानक बेतले असावे, असे विनोदाने म्हणत बर्नी म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी मी भारतात गेलो तेव्हा सोबत गीताचे फोटो व व्हिडिओ घेऊन गेलो होतो. ते अनेकांना दाखवून गीताच्या आई-वडिलांविषयी काही माहिती मिळते का शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही. गीताचे नातेवाईक शोधून तिला त्यांच्या हवाली करता यावे यासाठी आता माझ्या ट्रस्टने उभय देशांमध्ये नव्याने प्रयत्न सुरु केले आहेत.
येत्या सप्टेंबरमध्ये दलाई लामा यांना भेटण्यासाठी आपण भारतात धर्मशाला येथे जाऊ तेव्हाही त्यादृष्टीने प्रयत्न करू, असे सांगताना भारत सरकारनेही सक्रियतेने मदत केली तर चांगले होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गीता सध्या कराचीत बिल्किस एधी यांच्या घरी राहते. त्या पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या व ख्यातनाम एधी फौंडेशन या धर्मादाय संस्थेचे संस्थापक अब्दुल सत्तार एधी यांच्या पत्नी आहेत. आता २२ ते २४ वर्षांची असलेली ‘गीता’ हातांनी खाणाखुणा करून नेहमी आपल्याला विमानातून घरी परत जायचे आहे, असे सांगत असते. कधी कधी ती खूप रडते. लवकरात लवकर तिची तिच्या कुटुंबियांशी गाठ पडो, अशी मी अल्लाकडे प्रार्थना करीत असते, असे ब्ल्कििस म्हणाल्या.
बिल्किस पुढे म्हणाल्या की, आम्ही आमच्या घरात तिच्यासाठी एक मंदिर तयार केले आहे. तेथे ती वरचेवर प्रार्थना करीत असते. ती धार्मिक कुटुंबातील असावी, असे वाटते. तिचा दुपट्टा कधीही डोक्यावरून खाली ढळत नाही. एधी फौंडेशनमधील मुलांसोबतही ती बराच वेळ रमते.
आता जी ‘गीता’ म्हणून ओळखली जाते ती ही मुलगी सुमारे १५ वर्षांपूर्वी बहुधा भारतातून आलेल्या रेल्वेने लाहोर शहरात आली असावी. बेवारस अवस्थेत पाहिल्यावर पोलिसांनी तिला सरकारी बालसुधार गृहात नेऊन सोडले. गीताला बोलता व ऐकू येत नसल्याने नेहमीच अडचणी आल्या. त्यातून गैरसमज होऊन तिची सुधारगृहातील कर्मचाऱ्यांशी भांडणे झाली व तिने तेथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. बिल्किस यांच्या सांगण्यानुसार भारतातील तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर तिला कराचीला पाठविण्यात आले. कुठल्याच शेल्टर होममध्ये तिचे जमेनासे झाल्याने वर्ष २०१२ च्या सुरुवातीस तिला एधी फौंडेशनच्या कराचीमधील अनाथाश्रमात आणण्यात आले.
उंचीने बुटकी असलेली गीता तिच्या वयाच्या मानाने बरीच तरुण दिसते. गीताने बह्यांमध्ये हिंदी भा,ेत बरेच काही लिहून ठेवले आहे. पण एधी फौंडेशनमध्ये हिंदी समजणारे कोणीच नसल्याने तिने काय लिहिले आहे हे कळायला मार्ग नाही, असे बिल्किस सांगतात.
(वृत्तसंस्था)

 

Web Title: 'Bajrangi Bhaijaan' of Pakistan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.