उत्तर कोरियाकडून पुन्हा "बॅलेस्टिक" क्षेपणास्त्राची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2017 12:12 PM2017-07-04T12:12:47+5:302017-07-04T12:15:21+5:30
उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली, असे जपान आणि दक्षिण कोरिया सरकारचे म्हणणं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सोल, दि. 4 - उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली, असे जपान आणि दक्षिण कोरिया सरकारचे म्हणणं आहे. उत्तर कोरियानं बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर जपानचे असे म्हणणे आहे की, कदाचित हे क्षेपणास्त्र जपानमधील सागरी परिसरातील विशेष आर्थिक क्षेत्रात पडले. आधीच तणावाचे वातावरण असताना उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचण्यांच्या प्रमाणात वाढ केली आहे.
दक्षिण कोरिया आणि जपानमधील अधिका-यांच्या माहितीनुसार मंगळवारी हे क्षेपणास्त्र 40 मिनिटांत 930 किलोमीटरपर्यंत पोहोचले.
जपानचे कॅबिनेट सचिव प्रमुखांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, उत्तर कोरिया वारंवार परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कृती स्वीकारार्ह नाहीत. आम्ही याविरोधात तीव्र प्रतिकार दर्शवू आणि या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
मे महिन्यात दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या मून जे इन यांनी उत्तर कोरियाशी चर्चा करून हा मुद्दा निकाली काढण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानंतर मून यांनी सुरक्षा परिषदेची आपात्कालीन बैठक बोलावली.
गेल्याच आठवड्यात मून यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेटदेखील घेतली होती. ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत फोनवरुन उत्तर कोरियासंदर्भात बातचित केली होती.
यानंतर बरोबर एक दिवसानंतर उत्तर कोरियानं क्षेपणास्त्राची चाचणी केली.
दरम्यान, मे महिन्यातही उत्तर कोरियानं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली होती. आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी घेऊन अमेरिकेला एक प्रकारे धक्का दिला.
बीबीसीच्या माहितीनुसार, मे महिन्यात उत्तर कोरियाने कुसोंग शहरानजीकच्या समुद्रात स्थानिक वेळेनुसार 2,000 किलोमीटरच्या उंचीवरून मारा करणा-या क्षेपणास्त्राची चाचणी केली. पहाटे साडेपाच वाजण्याच्यादरम्यान हे क्षेपणास्त्र समुद्रात जवळपास सातशे किमी दूरपर्यंतच्या अंतरावर जाऊन पडले. संयुक्त राष्ट्रानं बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या परीक्षणावर प्रतिबंध घातले आहेत. तत्पूर्वी उत्तर कोरियानं संयुक्त राष्ट्रांचे नियम पायदळी तुडवून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. मात्र, ही चाचणी अयशस्वी ठरली होती.
दरम्यान, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या चाचणीवर टीकाही केली होती.