अमेरिकेत मतपेट्यांना अचानक लागतेय आग; निवडणुकीपूर्वी FBI तपासाला लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:05 PM2024-10-29T12:05:07+5:302024-10-29T12:12:10+5:30
अमेरिकेत ५ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच्या प्री इलेक्शनमध्ये बंपर मतदान होत आहे.
जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेत निवडणूक होत आहे. पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतासह सर्व देशांचे शेअर बाजारही याच निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहेत. अशावेळी अमेरिकेतून एक खळबळजनक वृत्त येत आहे.
अमेरिकेत ५ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच्या प्री इलेक्शनमध्ये बंपर मतदान होत आहे. परंतू, अनेक राज्यांमधील बॅलेट बॉक्सना आग लागण्याच्या घटना घडल्याने काहीतरी काळेबेरे तर केले जात नाहीय ना असा संशय निर्माण झाला आहे.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन आणि ओरेगनमध्ये अनेक ठिकाणी मतपेट्यांना आग लागली आहे. या मतपेट्यांचा वापर प्री इलेक्शनसाठी करण्यात आला होता. त्यामध्ये मते टाकण्यात आली होती. आग लागल्याने हे मतदान नष्ट झाले आहे. दोन्ही ठिकाणी सोमवारीच आग लागली आहे. ओरेगनच्या पोर्टलँड आणि वॉशिंग्टनच्या वँकूव्हरमधील मतदान केंद्रातील बॅलेट बॉक्सला आग लागली आहे.
निवडणुकीपूर्वीच मतदान झालेल्या बॅलेट बॉक्सला आग लागल्यामुळे एफबीआयने यात लक्ष घातले आहे. एफबीआय तपास संस्थेने तपास सुरु केला आहे. सोशल मीडियावर मतपेट्यांना आग लागल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये मतदान केंद्रातून धूर येताना दिसत आहे.
ज्या ज्या बॅलेट बॉक्सना आग लागली आहे त्याच्या बाहेरील आवरणावर संदिग्ध डिव्हाईस लावलेली दिसली आहेत. याचबरोबर दोन्ही ठिकाणच्या बॉक्सवर आग विझविण्यासाठी सप्रेशन सिस्टीम लावण्यात आली होती. परंतू, ती देखील फेल ठरली आहे. यामुळे यामागे कोणाचेतरी कारस्थान असल्याचा संशय पोलिसांना येत आहे.