बलूच आंदोलक करणार यूएन मुख्यालयाबाहेर निषेध
By admin | Published: September 8, 2016 06:26 PM2016-09-08T18:26:26+5:302016-09-08T19:44:17+5:30
फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटतर्फे संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयाबाहेर १३ सप्टेंबर रोजी ७३ व्या आमसभेच्या वेळेस निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 8 - बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाविरोधात फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटतर्फे संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयाबाहेर १३ सप्टेंबर रोजी ७३ व्या आमसभेच्या वेळेस निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान करत असलेल्या अन्यायामुळे, हत्या आणि बॉम्बफेकीमुळे तेथे लोकांना जगणे मुश्कील झाल्याचे मच फ्री बलुचिस्तानने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाकिस्तानने आजवर अवलंबलेल्या किल अँड डंप पॉलिसीमधून ५००० बलूची लोकांना ठार मारले असून आजही २०,००० बलूची लोक पाकिस्तानच्या छळाला सामोरे जात आहेत. आज बलुचिस्तान ज्या क्रौर्याचा सामना करत आहे, त्याचप्रकारच्या क्रौर्याला कोसोवो, पूर्व तिमोर, दक्षिण सुदान सामना करत असताना संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने हस्तक्षेप केला होता. संयुक्त राष्ट्राची निर्मिती दुसऱ्या महायुद्धानंतर लहान देशांच्या स्वातंत्र्याविरोधात होणाऱ्या अन्याय व अधिकाराच्या उल्लंघनास विरोध करण्यासाठी झाली होती.
पाकिस्तानने १९४७ साली संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व स्वीकारले आणि मानवाधिकार उल्लंघन व इतर राष्ट्रांशी कुरापती न करण्याच्या सनदेवर स्वाक्षरी केली होती. मात्र त्यानंतर काहीच महिन्यांमध्ये म्हणजे मार्च १९४८ मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानवर आक्रमण केले. हे आक्रमण आणि बलुचिस्तानात होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाविरोधात संयुक्त राष्ट्राने कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे सर्व देशांचे प्रतिनिधी आमसभेस आले असता हे आंदोलन करण्याचे फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटने ठरवल्याचे त्यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बलुची नेत्यांची भारताकडून अपेक्षा
भारताने बलुचिस्तानात होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत आवाज उठवावा, यासाठी बलुची नेत्यांनी आणि आंदोलकांनी भारताला नेहमीच विनंती केली आहे. त्याचप्रमाणे युरोपात आम्हाला आश्रय मिळतो तसा भारताने आम्हाला आश्रय दिला तर आम्हाला आनंदच होईल असे मत बलोच रिपब्लीकन पार्टीचे अध्यक्ष ब्रहुमदाग बुग्ती यांनी व्यक्त केले होते. मागील आठवड्यात बुग्ती यांनी गणेश चतुर्थी निमित्त भारतीयांना ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या होत्या.