बलूच बंडखोरांचा पाकिस्तानमध्ये धुमाकूळ, २४ तासांत ७३ जणांचा मृत्यू, १४ सैनिकांचाही समावेश   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 09:09 AM2024-08-27T09:09:44+5:302024-08-27T09:10:04+5:30

BLA Attack in Balochistan:

Baloch rebels rampage in Pakistan, 73 dead in 24 hours, including 14 soldiers    | बलूच बंडखोरांचा पाकिस्तानमध्ये धुमाकूळ, २४ तासांत ७३ जणांचा मृत्यू, १४ सैनिकांचाही समावेश   

बलूच बंडखोरांचा पाकिस्तानमध्ये धुमाकूळ, २४ तासांत ७३ जणांचा मृत्यू, १४ सैनिकांचाही समावेश   

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये बलूच बंडखोरांनी धुमाकूळ घातला आहे. मागच्या २४ तासांत पोलीस स्टेशन, रेल्वे रूळ आणि राष्ट्रीय महामार्गाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांसह एकूण ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला मागच्या काही वर्षांपासून बंडाळीमुळे अशांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. 

या हल्ल्याबाबत माहिती देताना पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत १४ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात बीएलएचे २१ बंडखोरही ठार झाले आहेत. बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ३८ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. ठार झालेल्या लोकांपैकी २३ जण हे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत. हल्लेखोरांनी लोकांची ओळख पटवून त्यांची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. हा हल्ला बलुचिस्तानमधील मुसाखाइल जिल्ह्यात करण्यात आला. हत्यारबंद हल्लेखोरांनी ट्रक आणि बसमधील प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्यामधील पाकिस्तानी पंजाबमधील प्रवाशांची ओळख पटवून त्यांच्यावर गोळीबार केला. 

बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए)ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बीएलएने या हल्ल्याला ऑपरेशन डार्क विंडी स्टॉर्म असं नाव दिलं आहे. बीएलएकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार ग्वादरमध्ये एका महिलेसह चार आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केला. दरम्यान, पाकिस्तानी अधिकारी या हल्ल्याबाबत फार काही बोलणं टाळत आहेत. मात्र बलूचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्यामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.  

बलूच लिबरेशन आर्मी हा पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध लढणारा पाकिस्तानमधील सर्वात मोठा बंडखोर गट आहे. पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधील नैसर्गिक वायू आणि खनिज संपत्तीची वारेमाप लूट करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे बलुचिस्तान हा प्रांत गरीब राहिला आहे, असा त्यांचा आरोप आहे. तसेच बलुचिस्तानमधून चीनला हद्दपार करणे आणि बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणे हे या गटाचं लक्ष्य आहे. 

Web Title: Baloch rebels rampage in Pakistan, 73 dead in 24 hours, including 14 soldiers   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.