बलुचिस्तानमध्ये फडकला तिरंगा, अकबर बुगतींसह मोदींचा फोटो झळकला
By admin | Published: August 25, 2016 07:27 AM2016-08-25T07:27:06+5:302016-08-25T07:27:06+5:30
पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे.
ऑनलाइन लोकमत
बलुचिस्तान, दि. 25 - पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळलेल्या बलूची लोकांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिली आहे. विशेष म्हणजे बलुचिस्तानमधले शहीद म्हणून ओळखले जाणारे नेते अकबर बुगती यांच्या फोटोसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही झळकले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला पोटशूळ उठलं आहे.
बलुचिस्तानमध्ये मागील चार दिवसांपासून पाकिस्तानकडून होणा-या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू आहे. यावेळी आक्रमक झालेल्या बलूची लोकांनी पाकिस्तानचा झेंडाही तुडवला आहे. तसेच सुई, डेरा बुगती, जाफराबाद, नसिराबादसह बलुचिस्तानच्या इतर भागांतही पाकिस्तानच्या अन्यायाविरोधात जोरदार आंदोलनं सुरू आहेत. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला होता. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी बलुचिस्तान, गिलगिलत-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना आपले आभार मानल्याचंही ते म्हणाले होते.
पाकिस्तान इथे नरसंहार करतो. पाकिस्तानी सैन्य प्रत्येक दिवशी डझनभर तरुणांची हत्या करतो. हजारो नागरिक बेपत्ता आहेत. पाकिस्तानने बलुचांना गुलाम बनवलं आहे, असा दावा यावेळी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थक नेते ब्रह्मदाग बुगती यांनी केला आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या विधानामुळे आणि भारताच्या नव्या भूमिकेमुळे आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फुटेल, अशी आशा निर्माण झाल्याचंही बुगती म्हणाले.