बेडरूममध्ये शेजारी विवस्त्र अनोळखी व्यक्ती झोपल्याने भंबेरी
By admin | Published: August 18, 2015 10:30 PM2015-08-18T22:30:49+5:302015-08-18T22:30:49+5:30
चोरून घरात शिरलेला एक पूर्णपणे विवस्त्र अनोळखी इसम बेडरूममध्ये येऊन गुपचूप आपल्या शेजारी झोपल्याचे समजले तेव्हा एका आॅस्ट्रेलियन जोडप्याची
मेलबर्न : चोरून घरात शिरलेला एक पूर्णपणे विवस्त्र अनोळखी इसम बेडरूममध्ये येऊन गुपचूप आपल्या शेजारी झोपल्याचे समजले तेव्हा एका आॅस्ट्रेलियन जोडप्याची चांगलीच भंबेरी उडाली!
‘डेली टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार न्यू साऊथ वेल्स राज्यातील मरोब्रा शहरात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ही अनोखी घटना घडली. घरात येऊन झोपलेला २५ वर्षांचा विवस्त्र इसम आयरिश असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या इसमावर घरफोडीचा गुन्हा नोंदविला असून अमली पदार्थांच्या सेवनाने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे की कसे याची तपासणी करण्यासाठी त्याला लगेच नजीकच्या इस्पितळात नेण्यात आले. या वृत्तानुसार केटी आणि क्रिस हे दाम्पत्य त्यांच्या घरात झोपलेले होते. रात्री दोन वाजता केटीला जाग आली तेव्हा तिला आपल्या एका बाजूला आपला पती व दुसऱ्या बाजूला पूर्णपणे विवस्त्र अनोळखी इसम शांतपणे झोपला असल्याचे दिसले. केटीने क्रिसला जागे केले व भयभीत अवस्थेत तो अनोळखी इसम त्याला दाखविला. क्रिसने हटकल्यावर त्या आगंतुकाने जागे होऊन डोक्याशी काढून ठेवलेले आपले कपडे उचलले व तो सरळ घराबाहेर जायला निघाला. हातात घेतलेले कपडे न घालताच त्या इसमाने तशाच अवस्थेत किचनच्या खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. ते न जमल्याने तो घरातच इकडे-तिकडे फिरत राहिला. अखेर पोलीस आले व त्याला पकडून घेऊन गेले. या दाम्पत्याने एक मांजर पाळलेले आहे. त्याला घरात येता यावे यासाठी त्यांनी किचनची खिडकी रात्री उघडी ठेवली होेती. त्यातूनच हा अनोळखी इसम घरात शिरला असावा, असा या दाम्पत्याचा कयास आहे. पण कपडे असूनही तो विवस्त्र अवस्थेत का होता व घरात शिरल्यावर तो बेडवर येऊन गुपचूप का झोपला हे कोडे मात्र लगेच सुटले नाही! (वृत्तसंस्था)