नेपाळमध्येही नोटाबंदी, भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 09:14 AM2018-12-14T09:14:56+5:302018-12-14T09:20:05+5:30
भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळनंही नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे.
काठमांडू- भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळनंहीनोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत नेपाळनं 100 रुपयांहून अधिक मूल्यांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला असून, त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत.
नेपाळी वृत्तपत्र काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, नेपाळ सरकारनं लोकांना आवाहन केलं आहे की, 100 रुपयांहून अधिक मूल्याचे म्हणजेच 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोट बाळगू नका. नेपाळमध्ये आता फक्त 100 रुपयांच्या नोटच चलनात आहेत. भारतात जेव्हा नोटाबंदी झाली, त्यावेळी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात 500 रुपयांच्या जुन्या नोटा अडकून पडल्या होत्या. त्या नोटांचा नेपाळ सरकारला काहीही उपयोग करता आला नाही.
या समस्येमुळेच नेपाळनं भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवरच बंदी घातली आहे. भारतीय चलन हे नेपाळमध्येही वापरलं जातं. नोटाबंदीमुळे नेपाळमधल्या अनेक बँकांमध्ये करोडोच्या नोटा तशाच पडून होत्या. ज्या परत चलनात आल्याच नाहीत. 8 नोव्हेंबर 2016ला भारत सरकारनं नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. ज्यात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती.