उत्तर कोरियातील मलेशियनना देश सोडण्यास बंदी
By admin | Published: March 8, 2017 01:45 AM2017-03-08T01:45:14+5:302017-03-08T01:45:14+5:30
मलेशियाच्या नागरिकांना उत्तर कोरियाने मंगळवारी देश सोडून जाण्यास बंदी घातली. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा सावत्र भाऊ किम जोंग-नाम यांच्या
कुआला लुम्पूर : मलेशियाच्या नागरिकांना उत्तर कोरियाने मंगळवारी देश सोडून जाण्यास बंदी घातली. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा सावत्र भाऊ किम जोंग-नाम यांच्या येथील विमानतळावर झालेल्या हत्येनंतर आमच्या नागरिकांना मलेशियाने ओलीस ठेवल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला असून त्या कृतीला जशासतसे उत्तर आता त्याने दिले आहे.
अण्वस्त्रांचा कार्यक्रम उत्तर कोरियाने थांबवावा यासाठी त्या देशावर कठोर निर्बंध असूनही जपानच्या समुद्रात त्याने क्षेपणास्त्रे डागल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्यावर मोठी टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने मलेशियन नागरिकांना देशाबाहेर जाण्यास अडवले. या निर्णयामुळे उभय देशांतील तणाव आणखी वाढला आहे. मलेशियाच्या नागरिकांवर देश सोडून जाण्याची बंदी ही तात्पुरती आहे, असे उत्तर कोरियाची वृत्तसंस्था ‘डीपीआरके’ने म्हटले. मलेशियन नागरिकांवरील बंदी ही किम जोंग-नाम यांच्या मृत्युची पारदर्शकपणे सोडवणूक करून मलेशियातील उत्तर कोरियाचे अधिकारी, नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाईपर्यंत राहील, असे उत्तर कोरियाने म्हटले. (वृत्तसंस्था)