मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश; तालिबानींनी शिक्षण बंद केल्याने संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:23 AM2023-01-06T08:23:39+5:302023-01-06T08:23:56+5:30
महिलांनी खासगी, सरकारी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अफगाणिस्तानचे उच्चशिक्षणमंत्री नेदा मोहम्मद नदीन यांनी २१ डिसेंबरला घेतला.
काबूल : अफगाणिस्तानातील महिलांनी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर तालिबान सरकारने बंदी घातल्यानंतर त्या उद्विग्न झाल्या आहेत. मुले जन्माला घाला व त्यांना वाढवा इतकेच काम तालिबानींनी आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे, असे संतप्त उद्गार या महिलांनी काढले. त्या देशातील महिलांचे स्वातंत्र्य तालिबान सरकारने आजवर विविध आदेशांद्वारे हिरावून घेतले आहे.
पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन अफगाणिस्तानला परतलेल्या इरम या युवतीने सांगितले की, मी भारतातून अफगाणिस्तानमध्ये परत आले. त्यावेळी तालिबान सरकार सत्तेवर आले होते. महिलांचे कोणतेही हक्क आम्ही हिरावून घेणार नाही, असे ते लोक सांगत होते; पण तालिबानी खोटारडे आहेत. त्यांनी आमचे विद्यापीठीय शिक्षण बंद केले, आम्ही मंडई, उद्यान अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकट्या जाऊ शकत नाही.
आमच्या प्रगतीचे सर्व मार्ग तालिबानींनी बंद केले आहेत. महिलांनी खासगी, सरकारी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अफगाणिस्तानचे उच्चशिक्षणमंत्री नेदा मोहम्मद नदीन यांनी २१ डिसेंबरला घेतला. (वृत्तसंस्था)
आता व्हॉट्सॲपद्वारे शिक्षण
- अफगाणिस्तानी महिलांचे शिक्षण थांबू नये म्हणून त्या देशातील सामाजिक कार्यकर्ते यांनी नवा मार्ग अंगीकारला आहे. ते या महिलांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत.
- काबूल विद्यापाठातील माजी प्राध्यापक हसीबुल्ला तरीन यांनी सांगितले की, मी माझ्या विद्यार्थिनींचे मोबाइलमध्ये क्रमांक सेव्ह करताना त्यांची नावे बदलली आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यामुळे मला असे करावे लागले.
- मुलींनी प्रोफाइलवर फोटो लावू नयेत, अशी सूचनाही मी त्यांना दिली आहे. त्याचे पालन करून विद्यार्थिनी शिकत आहेत.
विद्यापीठांना पत्र लिहून मांडली व्यथा
नदीन यांनी संबंधित विद्यापीठांना पत्र लिहिले. महिला विशिष्ट वेशभूषेच्या निकषांचे पालन करत नाहीत, विवाहामध्ये परिधान करतात तसे कपडे त्या घालतात. त्यामुळे त्यांच्या विद्यापीठीय शिक्षणावर बंदी आणली आहे, असे उद्गार नदीन यांनी काढले होते.