अफगाणिस्तानात गर्भनिरोधक गोळ्या व साधनांच्या विक्रीवर बंदी; आणखी एक जुलूम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:10 AM2023-02-21T11:10:29+5:302023-02-21T11:10:48+5:30
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट नव्हती त्यावेळी तिथे अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने सुधारणावादी सरकार सत्तेवर आले होते.
काबूल : अफगाणिस्तानमधीलतालिबान राजवटीने गर्भनिरोधक गोळ्या व साधनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ही साधने म्हणजे जगातील मुस्लीमांच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी आखलेला कट असल्याची टीका तालिबानने केली आहे. गर्भनिरोधक साधने वापरू नयेत यासाठी तालिबानी दहशतवादी घराघरात जाऊन महिलांना धमकावत असल्याचे वृत्त ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र अशी कोणतीही बंदी घातली नसल्याची सारवासारव तालिबान सरकारने
केली आहे.
ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, गर्भनिरोधक साधने विकायची नाहीत अशा धमक्या तालिबानचे दहशतवादी औषधाच्या दुकानदारांना देत आहेत. अफगाणिस्तानातील काबूल, मजार-ए-शरीफ या दोन शहरांमध्ये या साधनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गर्भनिरोधक साधनांच्या विक्रीला मज्जाव करून तालिबान सरकारने महिलांवर पुन्हा अन्याय केला आहे.
महिलांच्या शिक्षणावर वरवंटा
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट नव्हती त्यावेळी तिथे अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने सुधारणावादी सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी त्या देशात महिलांना मोकळा श्वास घेऊ शकत होत्या. काबूल विद्यापीठामध्ये महिलांचा सहभाग असलेले अनेक उपक्रम पार पडत होते. त्या देशातील अनेक महिला भारतासहित अनेक देशांत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या अफगाणिस्तानात परतल्यानंतर आपापल्या कार्यक्षेत्रात नोकऱ्या करत होत्या. मात्र तालिबानी राजवट आल्यानंतर महिलांचे बहुतांश हक्क हिरावून घेण्यात आले.
कोलमडली आरोग्यव्यवस्था
अफगाणिस्तानात आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. तेथील १४ पैकी एका महिलेचा प्रसूतीत निर्माण झालेल्या समस्यांमुळे मृत्यू होतो.
जगात अफगाणिस्तानसह असे काही देश आहेत की जिथे प्रसूतीसाठी पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. गर्भनिरोधकसाधनांवर बंदी घालण्याबाबत तालिबान सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र त्यांनी या साधनांवर अघोषित बंदी लागू केली आहे.
महिलांवर अनेक बंधने
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर तेथील महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. त्यांना महाविद्यालये, विद्यापीठात शिक्षण घेण्यास मनाई करण्यात आली. महिलांनी नोकरी करू नये, एकटीने घराबाहेर जाऊ नये अशी बंधने त्यांच्यावर लादण्यात आली आहेत.