टिकटॉकवर बंदी म्हणजे चीनचे हेरगिरीचे शस्त्र हिसकाविण्यासारखे, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 04:24 AM2020-07-17T04:24:51+5:302020-07-17T06:48:56+5:30
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन चीनी अॅप टिक टॉक, व्हीचॅट आणि अन्य अॅपवर अतिशय गांभीर्याने विचार करत आहे.
वॉशिंग्टन : भारतासारख्या देशांनी टिक टॉकसारख्या मोबाइल अॅपवर बंदी घालणे म्हणजे चीनचे हेरगिरीचे शस्त्र हिसकावून घेण्यासारखे आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी व्यक्त केले. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन चीनी अॅप टिक टॉक, व्हीचॅट आणि अन्य अॅपवर अतिशय गांभीर्याने विचार करत आहे. टिकटॉकसारख्या अॅपवरुन निर्माण झालेल्या धोक्याबाबत ते म्हणाले की, भारताने यापूर्वीच अशा अॅपवर बंदी घातली आहे. जर अमेरिकेनेही अशा अॅपवर बंदी घातली तर अन्य काही देशही बंदी घालतील. यामुळे चाइनीज कम्युनिस्ट पार्टीचे हेरगिरीचे शस्त्र हिसकावले जाईल.
ओ ब्रायन म्हणाले की, जे मुलं टिक टॉकचा उपयोग करतात त्यांच्यासाठी ते मनोरंजन असू शकते. पण, अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही आहेत. याचा उपयोग ते करु शकतात. ते आपला खासगी डेटा घेत आहेत. ते याची माहिती घेत आहेत की, आपले मित्र कोण आहेत? ते आपल्या सर्व संबंधांची माहिती घेत आहेत. सर्व माहिती थेट चीनच्या सुपर कॉम्युटरमध्ये जात आहे. चीन आपल्याबाबत सर्व काही जाणून घेत आहे. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे.
टिकटॉकवर बंदी लवकरच
- व्हाइट हाउसने संकेत दिले आहेत की, टिक टॉकसह चीनी अॅपबाबतचा निर्णय महिन्यात नव्हे, तर काही आठवड्यात घेतला जाईल.
- व्हाइट हाउसचे चीफ आॅफ स्टाफ मार्क मीडोज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, याबाबतचा निर्णय काही आठवड्यातच होईल.
- दरम्यान, २४ रिपब्लिकन संसद सदस्यांसह काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना विनंती केली आहे की, चीनी अॅपवर बंदी आणावी.