बांगलादेशातील ‘जमात’ प्रमुखाचा मृत्युदंड कायम
By admin | Published: May 6, 2016 01:56 AM2016-05-06T01:56:32+5:302016-05-06T01:56:32+5:30
१९७१च्या स्वातंत्र्यलढ्यातील युद्धगुन्ह्यांसाठी ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारे बांगलादेशातील कट्टरवादी जमात-ए-इस्लामीचा वरिष्ठ नेता मोती
ढाका : १९७१च्या स्वातंत्र्यलढ्यातील युद्धगुन्ह्यांसाठी ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारे बांगलादेशातील कट्टरवादी जमात-ए-इस्लामीचा वरिष्ठ नेता मोती-उर-रहमान निजामी याचे अंतिम अपील सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावले. त्यामुळे या नेत्याला धक्का बसला आहे.
निजामीने अंतिम अपीलद्वारे या शिक्षेचे पुनरावलोकन करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय अपीलीय खंडपीठाने एकाच वाक्यात निर्णय सुनावला. ७२ वर्षांच्या निजामी यांच्या अंतिम अपीलवर निर्णय देताना सरन्यायाधीश म्हणाले, ‘अपील फेटाळण्यात येत आहे.’ मुस्लीम बहुसंख्यांक असलेल्या या देशात सरन्यायाधीशपदापर्यंत पोहोचलेले सिन्हा हे पहिले हिंदू आहेत.
हत्या, बलात्कार व कट रचून बुद्धिवाद्यांच्या हत्या केल्या प्रकरणी निजामीला दोषी ठरविण्यात आले असून, त्याची आतापर्यंतची सर्व अपीले फेटाळण्यात आली आहेत. गुरुवारी त्याचे अखेरचे अपीलही फेटाळले गेले. निकालाचे लिखित स्वरूपातील विवरण नंतर जारी केले जाईल, असे न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीदरम्यान निजामीची उपस्थिती आवश्यक नव्हती. जमातच्या प्रमुखास काशीपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्युदंड झालेल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष बराकीत ठेवण्यात आले आहे.