शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ, वकिलाचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 17:05 IST2024-08-14T17:04:10+5:302024-08-14T17:05:35+5:30
Bangladesh : यापूर्वी मंगळवारी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर सहा जणांविरुद्ध अबू सईद नावाच्या किराणा दुकानदाराच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ, वकिलाचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Bangladesh : गेल्या काही दिवसांपूर्वी बांगलादेशात शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. यानंतरही येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे. दरम्यान, बांगलादेशात शेख हसीना यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
२०१५ मध्ये एका वकिलाचे अपहरण आणि जबरदस्तीनं बेपत्ता केल्याबद्दल शेख हसीना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्र्यांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशात शेख हसीना यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. डेली स्टार वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, जबरदस्तीनं बेपत्ता केल्याप्रकरणी पीडित सर्वोच्च न्यायालयाचे वकील सोहेल राणा या प्रकरणी अर्ज दाखल केला आहे.
ढाका मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट फरजाना शकीला सुमू चौधरी यांच्या खंडपीठाने आरोप एक केस म्हणून स्वीकारण्याचे आदेश दिले. या प्रकरणात शेख हसीना मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान, माजी कायदा मंत्री अनिसुल हक, माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) शाहिदुल हक, रॅपिड ॲक्शन बटालियनचे (RAB)माजी महासंचालक बेनझीर अहमद आणि रॅपिड ॲक्शन बटालियनच्या २५ अज्ञात लोकांचा समावेश आहे.
यापूर्वी मंगळवारी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर सहा जणांविरुद्ध अबू सईद नावाच्या किराणा दुकानदाराच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १९ जुलै रोजी मोहम्मदपूरमध्ये कोटा सुधारणा आंदोलनाच्या समर्थनार्थ निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अबू सईदचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. असं असलं तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे.