बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीनांसह नऊ जणांची चौकशी सुरू; देशात नरसंहाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 08:46 AM2024-08-16T08:46:11+5:302024-08-16T08:50:56+5:30

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाकडे जबाबदारी

Bangladesh Ex PM Sheikh Hasina along with nine people under investigation Allegation of genocide in the country | बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीनांसह नऊ जणांची चौकशी सुरू; देशात नरसंहाराचा आरोप

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीनांसह नऊ जणांची चौकशी सुरू; देशात नरसंहाराचा आरोप

ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य नऊ जणांविरुद्ध आता देशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाने चौकशी सुरू केली आहे. १५ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नरसंहार आणि अमानवी अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी बुधवारी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये हसीना यांच्यासह अवामी लीगचे सरचिटणीस आणि माजी रस्ते वाहतूक मंत्री ओबेद उल कादर, माजी गृहमंत्री असदुझ्झमान खान कमाल आणि पक्षातील इतर प्रमुख नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्ष आणि इतर संलग्न संस्थांच्या सहभागाची चौकशीही करण्यात येणार आहे.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेला इयत्ता नववीचा विद्यार्थी आरिफ अहमद सयाम याचे वडील बुलबुल कबीर यांनी याचिका दाखल केली. त्यांचे वकील गाझी एम.एच. तमीम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने याचिकेत हसीना आणि त्यांच्या सरकारविरोधात केलेल्या नरसंहार आणि अमानवी अत्याचाराच्या आरोपांचे पुनरावलोकन करण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशमधील हे आंतरराष्ट्रीय प्राधिकरण १९७१ च्या मुक्तिसंग्रामात पाकिस्तानी सैन्याच्या बंगाली भाषिक कट्टर सहयोगींवर झालेल्या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते.

चौकशीची प्रगती ७ दिवसात कळवणार

आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्यांसह तक्रारदार आणि साक्षीदाराचे जबाबही न्यायाधिकरणाकडे सादर करण्यात आले आहेत. या चौकशीच्या निकालाची प्रगती सात दिवसांत कळविण्यात येणार असल्याचेही तमीम यांनी सांगितले.

अपहरण, हत्या व इतर याचिकांवरही सुनावणी

  • विद्यार्थ्याच्या हत्येबरोबरच २०१५ मध्ये झालेल्या एका वकिलाचे अपहरण आणि एका भाजी विक्रेत्या दुकानदाराच्या हत्येचाही आरोप हसीना आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. 
  • या प्रकरणांची चौकशीदेखील हे न्यायाधिकरण करणार आहे. यासंदर्भात स्वतंत्र याचिकाही बुधवारी सादर करण्यात आल्या.
  • ढाका न्यायालयातही त्यांच्या विरोधात याचिका दाखल असून १५ सप्टेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे पोलिसांना निर्देश आहेत.


मुजीबूर रेहमान यांच्या पुण्यतिथीची सुट्टी रद्द

  • दरम्यान, हसीना यांचे वडील आणि बांगलादेश निर्मितीतील प्रमुख नेते बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांची १५ ऑगस्ट १९७५ रोजी हत्या झाली होती.
  • त्या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी १५ ऑगस्टला राष्ट्रीय दुखवटा दिन साजरा करण्याचा निर्णय हसीना सरकारने घेतला होता.
  • या दिवशी हसीना सरकारने सुट्टीही जाहीर केली होती. मात्र, मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने अवामी लीग सोडून इतर राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय रद्द केला आहे.


संयुक्त राष्ट्रांचे पथकही चौकशी करणार

  • बांगलादेशातील नरसंहार आणि राजकीय घडामोडींची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांचे विशेष पथक आता पुढील आठवड्यात बांगलादेशात जाणार आहे. 
  • या पूर्वी १९७१ बांगलादेश मुक्तिसंग्रामातील मानवी अत्याचारांची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी असे पथक नियुक्त केले होते. 
  • संयुक्त राष्ट्र मानवाधिकार विभागाचे प्रमुख वोल्कर तुर्क यांनी बुधवारी उशिरा बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांना फोनवर संपर्क केला आणि या चौकशी पथकाच्या दौऱ्याबाबत चर्चा केली. त्यानंतर, युनूस यांनी एक्स समाजमाध्यमांवर ही माहिती दिली. 

Web Title: Bangladesh Ex PM Sheikh Hasina along with nine people under investigation Allegation of genocide in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.