बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, सचिवालयाला घेराव, दोन गटात हाणामारी, ५० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:02 AM2024-08-26T10:02:53+5:302024-08-26T10:03:55+5:30
अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालयात ताब्यात घेतलेल्यांमध्ये विद्यार्थी नेता आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार नाहीद इस्लाम याचाही समावेश आहे.
बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. राजधानी ढाका येथील सचिवालयाजवळ काल रात्री अन्सार ग्रुपचे (होमगार्ड) सदस्य आणि विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीच्या घटनेत ५० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी अन्सार ग्रुपचे सदस्य गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ही घटना रविवारी रात्री घडली. त्यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी हातात लाठ्या घेऊन सचिवालयाकडे मोर्चा वळवला. अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालय ताब्यात घेतले होते. त्यांनी सचिवालयाचे गेट बंद केले होते. सचिवालयात उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना बाहेर पडू दिले नाही. यादरम्यान, अनेक विद्यार्थीही सचिवालयात अडकले होते. या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना सचिवालयात येण्याचे आवाहन केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटी डिस्क्रिमिनेशन स्टुडेंट मूव्हमेंटच्या अनेक समन्वयकांनी विद्यार्थ्यांना राजू स्कल्पचर येथे जमण्यास सांगितलं होतं, तेथून या विद्यार्थ्यांनी सचिवालयाकडे मोर्चा वळवला. सुरुवातीला अन्सार ग्रुपचे सदस्य मागे हटू लागले होते. मात्र नंतर त्यांनी विद्यार्थ्यांचा काठ्यांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, एकमेकांवर जोरदार दगडफेक झाल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले आहेत.
Clashes occurred between students and Ansar members near the Secretariat in the capital, leaving around 40 people from both sides injured on Sunday night. The clashes took place after 9pm, with both sides engaging in a series of chases.#Dhaka#Bangladesh#DhakaUniversitypic.twitter.com/NuquufuOYF
— Basherkella - বাঁশেরকেল্লা (@basherkella) August 25, 2024
अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालयात ताब्यात घेतलेल्यांमध्ये विद्यार्थी नेता आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार नाहीद इस्लाम याचाही समावेश आहे. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. अन्सार ग्रुपच्या आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, अन्सार ग्रुप गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत आहे. त्यांच्या नोकऱ्या कायम कराव्यात, अशी या गटाची मागणी आहे. याचबरोबर, अन्सार ग्रुप बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
बांगलादेशात अंतरिम सरकार
सध्या बांगलादेशात अंतरिम सरकार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. सध्या त्या भारतात वास्तव्यास आहेत. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. असं असलं तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे.