"दिल्लीला तुमच्यासोबत..."; समन्स बजावल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावून गेले भारतीय उच्चायुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:48 PM2024-12-04T13:48:42+5:302024-12-04T14:15:15+5:30
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारतीय उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते.
Bangladesh Voilence :बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु आहेत. अशातच बांगलादेश अतिशय बालिश अशी पावले उचलत आहे. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी मंगळवारी आगरतळा येथील बांगलादेश उप उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या तोडफोडीनंतर देशाच्या अंतरिम सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेतली. वर्मा यांना ढाका येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी प्रणय वर्मा यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावल्याचे म्हटलं जात आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने मंगळवारी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते. परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांना समन्स बजावण्यात आले होतं. आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालयात काही आंदोलकांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडल्यानंतर आणि मालमत्तेची तोडफोड केल्याच्या बांगलादेशने प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावले.
"दिल्लीला बांगलादेशसोबत स्थिर, रचनात्मक संबंध निर्माण करायचे आहेत. कोणताही मुद्दा द्विपक्षीय संबंधात अडथळा बनू नये. आम्ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत," असं भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी म्हटलं. भारतीय उच्चायुक्त दुपारी ४ वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले होते.
दुसरीकडे, आगरतळा येथील बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तांनी सुरक्षेच्या परिस्थितीचा हवाला देत पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या सर्व व्हिसा आणि कॉन्सुलर सेवा निलंबित केल्या आहेत. तर घटनेत सहभागी असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात निदर्शने सुरू असताना ही घटना घडली.
दरम्यान, बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांना अटक आणि हिंदू समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे हजारो लोकांनी प्रचंड आंदोलन केल होते. आंदोलक बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयात घुसले आणि त्यांनी तोडफोड केली. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटलं. याला हिंदू संघर्ष समिती नावाची संघटना जबाबदार असल्याचा आरोप नजरुल यांनी केला. या घटनेत बांगलादेशचा राष्ट्रध्वज जाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.