बांगलादेशही श्रीलंकेच्या वाटेवर! पेट्रोल ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग; नागरिक रस्त्यावर उतरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 12:48 PM2022-08-07T12:48:15+5:302022-08-07T12:48:57+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. ही समस्या संपूर्ण जगभरातच भेडसावत आहे. पण बांगलादेशची अवस्था आता श्रीलंकेसारखी होत चालली आहे.

bangladesh hikes petrol price by 51 percent and diesel rate by 42 percent highest in history | बांगलादेशही श्रीलंकेच्या वाटेवर! पेट्रोल ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग; नागरिक रस्त्यावर उतरले

बांगलादेशही श्रीलंकेच्या वाटेवर! पेट्रोल ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग; नागरिक रस्त्यावर उतरले

googlenewsNext

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. ही समस्या संपूर्ण जगभरातच भेडसावत आहे. पण बांगलादेशची अवस्था आता श्रीलंकेसारखी होत चालली आहे. बांगलादेशमध्ये आज पेट्रोलच्या दरात इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक दराची नोंद झाली आहे. बांगलादेशने एका झटक्यात पेट्रोलचे दर ५१ टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. एका अहवालानुसार १९७१ मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकाच वेळी झालेली ही आजवरची सर्वात मोठी वाढ आहे. एएनआयनं स्थानिक मीडियाच्या हवाल्यानं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. 

पेट्रोलच्या दरात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. लोकांना आता श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढावेल याची भीती वाटू लागली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झाली असून, त्याविरोधात पोलिसांना कारवाई करावी लागली आहे. ढाका ट्रिब्यूनमधील एका वृत्तानुसार, सरकारनं पेट्रोलच्या दरात वाढ केल्यानं पेट्रोल पंपांबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज आहेत ज्यामध्ये लोक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावून आपल्या वाहनाची टाकी फूल करण्यासाठी धडपडत आहेत. 

दर गगनाला भिडले
ढाक्याच्या आजूबाजूच्या मोहम्मदपूर, आगरगाव, मालीबाग आणि लगतच्या भागातील अनेक पेट्रोल पंपांनी त्यांचे काम बंद केल्याचंही वृत्त आहे. दर वाढल्यानंतर या पेट्रोल पंपांनी आपले काम सुरू केले. बांगलादेश ऑफ पॉवर, एनर्जी आणि मिनरल रिसोर्सेसने एका अधिसूचनेत म्हटले आहे की ऑक्टेनची किंमत आता १३५ टका असेल, जी आधीच 51.7% वाढल्यानंतरची किंमत आहे. पूर्वी एक लिटर ऑक्टेनची किंमत ८९ टका होती. या वर्षी फेब्रुवारी ते जुलै दरम्यान तेलांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यानंतर दरवाढीची घोषणा करण्यात आली, असं बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशननं (बीपीसी) म्हटलं आहे. 

महागाईत एवढी वाढ का?
रशिया-युक्रेन युद्ध आणि कोविड-19 महामारीने तेलाच्या किमती वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या दोन्ही घडामोडींमुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. बांगलादेशात पेट्रोलच्या दरात ५१ टक्के तर डिझेलच्या किमतीत ४२ टक्के वाढ झाली आहे. रशिया-युक्रेनमुळे मागणी-पुरवठा समीकरण बिघडले आणि कोविड महामारीमुळे ओपेक देशांनी तेलाचा पुरवठा कमी केला. त्यामुळे जगभरातील पुरवठ्यावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. बांगलादेशच्या या महागाईनंतर जनता रस्त्यावर उतरली आहे. विविध भागात निदर्शनं होताना दिसत आहेत. 

रस्त्यावर उतरले नागरिक
महागाईविरोधात बांगलादेशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. लोक पोस्टर आणि बॅनर घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. काही ठिकाणांहून हिंसक निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. महागाईमुळे बांगलादेशची अवस्था श्रीलंकेसारखी होऊ शकते, अशी भीती लोकांमध्ये आहे. श्रीलंकेतही अशीच परिस्थिती आहे जिथे पेट्रोल आणि डिझेल आता लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. अत्यावश्यक सेवांसाठीच पेट्रोलची विक्री केली जात आहे. श्रीलंका आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. बांगलादेशात खाण्यापिण्याच्या महागाईनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. यामुळे लोक संतप्त झाले असून ते सरकारविरोधात सातत्यानं निदर्शनं करत आहेत.

Web Title: bangladesh hikes petrol price by 51 percent and diesel rate by 42 percent highest in history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.