बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:19 AM2024-11-27T11:19:17+5:302024-11-27T11:20:06+5:30

Bangladesh : बांगलादेशात केवळ इस्कॉन मंदिरावर हल्ला केला जात नाही, तर येथील इतर मंदिरांना देखिल कट्टरपंथी इस्लामिक समूहांकडून लक्ष्य केले जात आहे.

bangladesh hindu attack by protestor, demand for ban over iskcon temple, know how many temples in country | बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?

बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?

बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसचे (इस्कॉन)  प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांनाही अटक करण्यात आली आहे. यानंतर याठिकाणी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बांगलादेशात ४ महिन्यांपूर्वी  झालेल्या सत्तापालटानंतर देशातील परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. 

शेख हसीना यांचे सरकार पडल्यावर येथील परिस्थीत अधिक बिकट बनली आणि त्या आपला देश सोडून भारतात आल्या आहेत. बांगलादेशात केवळ इस्कॉन मंदिरावर हल्ला केला जात नाही, तर येथील इतर मंदिरांना देखिल कट्टरपंथी इस्लामिक समूहांकडून लक्ष्य केले जात आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, बांगलादेशमध्ये सध्या ४० हजार मंदिरे आहेत.

दरम्यान, बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात कट्टरपंथी इस्लामिक समूहांनी इस्कॉनला लक्ष्य केले आहे. तसेच, याविरोधात #BanISKCON आणि #ISKCONisTerrorist सारख्या ऑनलाइन मोहिमा चालवल्या जात असून देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सांप्रदायिक स्थिरतेला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, शेख हसीना भारतात आल्यानंतर खुलना विभागातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली होती.

कट्टरपंथी इस्लामिक समूहांना खूश करण्याचा प्रयत्न
बांगलादेशातील नवीन युनूस सरकारवर कट्टरपंथी इस्लामिक समूहांना खूश करण्याचा आणि इस्कॉनवर हल्ला करण्यासाठी परवानगी देण्याचा आरोप आहे. बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना हिफाजत-ए-इस्लामने शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर इस्कॉनच्या विरोधात रॅली काढली, ज्यामध्ये निदर्शकांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच, इस्कॉनच्याविरोधात घोषणाबाजी केली. एवढेच नाही तर #BanISKCON आणि #ISKCONisTerrorist सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. याशिवाय इस्कॉनवर हिंसाचार भडकावल्याचा आणि शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगशी संबंध असल्याचा आरोप आहे.

समुदाय तणाव
बांगलादेश सनातन जागरण मंच आणि इस्कॉनच्या सदस्यांनी हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात रॅली काढल्या आहेत. इस्कॉनवर बंदी घातल्याने हिंदू समुदायात असुरक्षितता वाढेल आणि त्यांच्या अस्मितेला धोका निर्माण होईल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, बांगलादेशमध्ये इस्कॉनचे चांगले नेटवर्क आहे. बांगलादेशात ढाका, मेमनसिंह, राजशाही, रंगपूर, खुलना, बारिसाल, चटोग्राम आणि सिवहट येथे इस्कॉनची मंदिरे आहेत. येथील मंदिरावर श्रद्धा ठेवणाऱ्यांची आणि पूजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची संपत्तीही खूप जास्त आहे. बांगलादेशातील गरिबांना ते दररोज मदत करतात. बांगलादेशात गेल्या महिन्यात आलेल्या पुराच्यावेळीही इस्कॉन मंदिरातील लोकांनी खूप मदत केली होती.

Web Title: bangladesh hindu attack by protestor, demand for ban over iskcon temple, know how many temples in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.