बांगलादेशात आणखी एका मंदिरावर हल्ला, दुर्गा पूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना, पेट्रोलने जाळण्याचाही प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:08 AM2024-09-02T11:08:47+5:302024-09-02T11:10:16+5:30
Bangladesh Hindu Crisis : बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्येही सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरांवर अजूनही हल्ले होत आहेत. आता दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे.
बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्येही सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरांवर अजूनही हल्ले होत आहेत. आता दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली.
रात्री उशिरा काही उपद्रवी लोकांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुर्गा पूजेसाठी मातीपासून बनवण्यात आलेल्या मातेच्या मूर्तीची विटंबना केली. शेरपूर जिल्ह्यातील हा भाग मेघालय सीमेला लागून आहे. मंदिर समितीचे सरचिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पेट्रोल शिंपडून मूर्ती जाळण्याचाही प्रयत्न केला, मात्र आग लागू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान उपद्रवी हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
अद्याप कुणालाही अटक नाही -
माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चौकशी केली. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. तपासानंतर उपद्रवी हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर अशा अनेक बातम्या सातत्याने समोर येत आहेत. हिंदूंच्या घरांना आणि मंदिरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. यामुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेख हसीना सरकार पडल्यानंतर देशात हिंसाचार माजला आहे. 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवरील हल्ल्याच्या घटनांचा आकडा 205 वर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात आलेल्या वृत्तांनुसार, जर भारत सरकारने व्हिसा दिला नाही, तर आम्ह सीमा ओलांडण्यासही तयार आहोत. आता आम्हाला बांगलादेशात गुदमरल्याप्रमाणे जीवन जगायचे नाही. येथे सात्याने अत्याचार वाढत आहेत. एक बांगलादेशी हिंदूने म्हटल्याप्रमाणे, कट्टरपंथी मुस्लीम लोक अजूनही जमीन, मालमत्ता, सोने, पैसे आणि मुलींची मागणी करत आहेत. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. यामुळे अक्षरशः लपून राहावे लागत आहे.