बांग्लादेशात ISI ची एन्ट्री; ईशान्य भारतात तणाव वाढणार? तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:50 IST2025-01-31T14:49:35+5:302025-01-31T14:50:40+5:30
Bangladesh News: आयएसआय बांग्लादेशमार्गे भारतात कारवाया करण्याची दाट शक्यता आहे.

बांग्लादेशात ISI ची एन्ट्री; ईशान्य भारतात तणाव वाढणार? तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
Bangladesh News: बांग्लादेशातील सत्तापालटानंतर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) येथे आपला हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. बांग्लादेशातील काही मोक्या भागात आयएसआय आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
1971 मध्ये बांग्लादेशच्या निर्मितीपूर्वी हा प्रदेश पूर्व पाकिस्तान होता. या भागातील काही ठराविक क्षेत्रात पाकिस्तानी लष्कराची तैनाती होती. त्यामुळे भारतासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली होती. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानी लष्कर नागालँड आणि मिझोराम सारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या बंडखोर गटांना समर्थन द्यायचे.
ढाका ट्रिप दरम्यान चर्चा
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांच्या ढाका दौऱ्यात दोन्ही बाजूंनी कॉक्स बाजार, उखिया, टेकनाफ, मौलवीबाजार, हबीगंज आणि शेरपूरमध्ये आयएसआयच्या तैनातीच्या शक्यतेवर चर्चा झाली. 1971 मध्ये बांग्लादेशच्या निर्मितीपूर्वी या भागात पाकिस्तानी लष्कराची तैनाती होती. इथून पाकिस्तानी लष्कर ईशान्येकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या बंडखोर गटांना मदत करत असे. ISI पुन्हा एकदा भारताच्या ईशान्य आणि पूर्व सीमेवर आपले नेटवर्क वाढवण्याचा विचार करत आहे.
तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
बांग्लादेश प्रकरणातील तज्ज्ञ ढाकामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वेगाने होत असलेल्या घुसखोरीमुळे चिंतेत आहेत. आयएसआय बांग्लादेश लष्कराच्या इस्लामवादी आणि जमात समर्थक गटाला समर्थन करत असल्याचा आरोप आहे. बांग्लादेश लष्कराचे क्वॉर्टर मास्टर जनरल लेफ्टनंट जनरल फैजुर रहमान यांच्याशिवाय, बांग्लादेश लष्कराच्या 24 विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल मीर मुशफिक रहमान यांचेही देशांतर्गत कट्टरपंथी आणि आयएसआयशी जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे.
निशाण्यावर अल्पसंख्याक हिंदू समाज
कट्टरतावादाला प्रोत्साहन देणारे गट बांग्लादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदू आणि अहमदिया समुदायांवर हल्ले करत आहेत. ह्युमन राइट्स वॉचने (एचआरडब्ल्यू) आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर अवामी लीग समर्थक आणि पत्रकारांना लक्ष्य करण्यात आले होते.