बांगलादेशाची पुन्हा एकदा सत्तांतराच्या दिशेने वाटचाल; सैन्यानं बोलावली तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:24 IST2025-03-25T14:23:20+5:302025-03-25T14:24:28+5:30
विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आवाज उचलला होता ज्यातून सैन्यातही अंतर्गत विरोध निर्माण झाला होता.

बांगलादेशाची पुन्हा एकदा सत्तांतराच्या दिशेने वाटचाल; सैन्यानं बोलावली तातडीची बैठक
बांगलादेशात मागील काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता वाढली आहे. त्यामुळे तिथे पुन्हा एकदा सत्तांतर नाट्य सुरू झालं आहे. सोमवारी बांगलादेशच्या सैन्यानं याच परिस्थितीत तातडीची बैठक बोलावली. ज्यात देशातील प्रमुख सैन्य अधिकारी हजर होते. या बैठकीनंतर लवकरच सैन्य देशात सत्तेवर नियंत्रण आणू शकते असं बोललं जात आहे.
सैन्याच्या या बैठकीत ५ लेफ्टिनेंट जनरल, ८ मेजर जनरल, स्वतंत्र ब्रिगेड कमांडिंग अधिकारी आणि सैन्य मुख्यालयातील अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते. देशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात सैन्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होते. सैन्याने देशात सक्रियता वाढवली आहे ज्यातून सत्तापालट होण्याची शक्यता आणखी वाढली आहे. जेव्हा मोहम्मद युनूस यांनी सत्ता सांभाळली होती तेव्हा बांगलादेशात असंतोष आणि अस्थिरता वाढली होती. विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आवाज उचलला होता ज्यातून सैन्यातही अंतर्गत विरोध निर्माण झाला होता.
रिपोर्टनुसार, सैन्य आता राष्ट्रपतींवर दबाव बनवू शकतं, ज्यातून ते आपत्कालीन घोषणा किंवा मोहम्मद युनूस यांना सत्तेतून हटवण्याची आग्रही मागणी करू शकतील. राष्ट्रीय एकतेवर फोकस देणारं सरकार बनवण्याची सैन्याची योजना आहे, जे सरकार पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणात असेल. मोहम्मद युनूस सत्तेत आल्यापासून लोकांमध्ये सरकारबद्दल असंतोष वाढला आहे. त्यामुळे त्यातून सरकारविरोधी बंडखोरीचं पाऊल उचलले जाऊ शकते.
दरम्यान, मोहम्मद युनूस लवकरच चीनचा दौरा करणार आहे. जो बांगलादेशासाठी महत्त्वाचा आहे. या भेटीमुळे केवळ देशातील राजकीय समीकरणांवरच परिणाम होऊ शकत नाही तर चीन-बांगलादेश संबंधांमध्येही बदल घडून येऊ शकतात, ज्यामुळे प्रादेशिक शक्ती संतुलनावर परिणाम होईल.