शेख हसीना पंतप्रधानपदावरून पायउतार; बांगलादेश सोडून भारतात येण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 02:59 PM2024-08-05T14:59:08+5:302024-08-05T15:37:09+5:30
शेख हसिना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्या दुसऱ्या देशात गेल्या असल्याचे म्हटलं जात आहे.
Bangladesh PM Sheikh Hasina : बांगलादेशातीलआरक्षणविरोधी आंदोलन आता आणखी तीव्र झाले आहे. हजारो आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसले आहेत. देशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. अशातच पंतप्रधान शेख हसीना यांनी निवासस्थान सोडून भारताकडे येण्यासाठी निघाल्याची चर्चा आहे. पंतप्रधान हसिना आणि त्यांची बहीण रेहाना देश सोडून लष्करी हेलिकॉप्टरने भारतात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजधानी ढाका सोडली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. जीवाला धोका टाळण्यासाठी शेख हसिना या त्यांच्या बहिणीसाठी हेलिकॉप्टरने त्रिपुराच्या आगरतळा येथे पोहोचल्या आहेत.शेख हसिना यांना व्हिडीओतून देशातील नागरिकांना संदेश द्यायचा होता. मात्र लाखो आंदोलक शेख हसिना यांच्या अधिकृत निवासस्थानाकडे निघाल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांनी तात्काळ देश सोडला.
बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये अनेकाचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी टांगेल आणि ढाका येथील महत्त्वाचे महामार्ग ताब्यात घेतले आहेत. हसीना यांच्या सरकारच्या विरोधात सुमारे ४ लाख बांगलादेशी लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी दुपारी २.३० वाजता लष्करी हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले आणि त्या भारतात आल्या असल्याचे म्हटलं जात आहे.
रविवारी हिंसाचारत ९८ जणांचा मृत्यू झाला होता. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन आठवड्यात बांगलादेशातील हिंसाचारात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी तीव्र संघर्षात ९८ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख वाकर-उझ-झमान राष्ट्राला संबोधित करणार होते. जमान हे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत भविष्यातील कृती ठरवण्यासाठी बैठक घेत होते. मात्र त्याचदरम्यान, मोठ्या संख्येने आंदोलक हसिना यांच्या निवासस्थानाकडे निघाल्याने परिस्थिती चिघळली.
दरम्यान, बांगलादेशातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच देशाची सूत्रे लष्कराकडे जाण्याची शक्यता आहे.