खाजगी विमानाने प्रवास, २८४ कोटींची मालमत्ता..., नोकराची संपत्ती पाहून बांगलादेशच्या PM शेख हसीना झाल्या थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:19 PM2024-07-18T16:19:20+5:302024-07-18T16:33:14+5:30
Bangladesh : हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरात नोकर म्हणून राहिलेल्या एका व्यक्तीकडे २८४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. तसेच, त्या व्यक्तीकडे प्रायव्हेट जेट असून सध्या तो अमेरिकेत वास्तव्यास आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
ढाका ट्रिब्यूनच्या बातमीनुसार, जहांगीर आलम असे या व्यक्तीचे नाव असून तो प्रायव्हेट जेटने प्रवास करत होता. शेख हसीना यांच्या कार्यालयात काम करतो, असे सांगून तो लोकांकडून पैसे लुटायचा, तर पंतप्रधानांच्या घरी पाहुण्यांना चहा, पाणी आणि नाश्ता देत असे, असेही समोर आले आहे. काम करून देण्याच्या बहाण्याने तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता. जहांगीर आलम हा अमेरिकेत पळून गेला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांना जेव्हा हे प्रकरण कळाले, तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पीएम हसीना म्हणाल्या, "माझ्या घरी काम करणारी व्यक्ती आज करोडोंच्या मालमत्तेची मालक आहे. एवढा पैसा त्याने कुठून कमवला? एका सामान्य बांगलादेशी व्यक्तीला एवढी मालमत्ता जमवायला १३ हजार वर्षे लागू शकतात. सरकार या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करेल".
दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात जहांगीर आलमचे नाव पुढे आले आहे. भ्रष्टाचाऱ्यांबाबत एक यादी तयार करण्यात आली असून त्यात माजी लष्करप्रमुख, पोलीस अधिकारी, कर अधिकारी यांच्यासह अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, माजी लष्करप्रमुख अझीझ अहमद यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भ्रष्टाचारविरोधी आयोगाने त्यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या असून त्यांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत.