बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर आंदोलकांनी देशाच्या निर्मात्याचाच पुतळा तोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:32 PM2024-08-05T16:32:08+5:302024-08-05T16:33:06+5:30
Bangladesh protests Update: बांगलादेशमधील आंदोलनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, आंदोलकांनी बांगलादेशच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याची मोडतोड केली आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून देश पेटला असतानाच बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्या भारतामध्ये दाखल झाल्या आहेत. तर बांगलादेशमधील आंदोलनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, आंदोलकांनी बांगलादेशच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याची मोडतोड केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात काही आंदोलक बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हटल्या जाणाऱ्या वंगबंधूंच्या पुतळ्यावर चढून हातोड्याने प्रहार करताना दिसत आहेत.
आरक्षणाविरोधात पेटलेल्या आंदोलनादरम्यान बांगलादेशमध्ये आतापर्यंत शेकडो आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आंदोलकांकडून पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. तसेच राष्ट्रव्यापी संचारबंदी झुगारून लावत आंदोलक ढाका येथील शाहबाग चौकामध्ये गोळा झाले. याचदरम्यान, काही आंदोलकांनी शेख हसिना यांचे वडील आणि बांगलादेशच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याला लक्ष्य केले. या आंदोलकांनी शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्यावर चढून त्यावर हातोडा चालवला. बांगलादेशमधील आंदोलनामध्ये रविवारी सुमारे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
या घडामोडींदरम्यान, बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी शांतता कायम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. देशाला संबोधित करताना लष्करप्रमुख आंदोलकांना उद्देशून म्हणाले की, तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. तोडफोडीपासून दूर राहा. तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर आम्ही स्थितीमध्ये बदल करू. हिंसाचार, अराजकतेपासून दूर राहा. बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.