बांगलादेश पुन्हा पेटले; १०० ठार, एकाच पोलीस ठाण्याच्या १३ पोलिसांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 07:47 AM2024-08-05T07:47:32+5:302024-08-05T07:48:02+5:30
Bangladesh Riots, Protest : पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पेटला वाद; इंटरनेट बंद
ढाका: पंतप्रधान शेख हसीना राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला.. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात १४ पोलिसांसह १०० पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला असून ४०पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हिंसाचारावर नियंत्रणासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली असून, ३ दिवस सुट्टी जाहीर केली आहे. आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला, त्याच १३ पोलिसांचा मृत्यू झाला.
शेख हसीना जानेवारी २०२४मध्ये पंतप्रधानपदी निवडून आल्या. मात्र, या निवडणुकीवर विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलीस्ट पार्टीने (बीएनपी) बहिष्कार टाकला होता. रविवारी बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. त्यांचा अवामी लीग, विद्यार्थी लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पेटला. आंदोलकांनी प्रमुख रस्ते रोखल्यानंतर राजधानी ढाक्यासह इतर शहरांमध्येही संघर्ष पेटला.
लष्कर मागे घ्या : माजी लष्करी अधिकाऱ्यांची मागणी
हिंसाचार रोखण्यासाठी शेख हसीना यांनी लष्कराला पाचारण केले आहे. मात्र, त्यांना रस्त्यांवरून मागे घ्या आणि बराकीमध्ये परत पाठवा, अशी मागणी माजी लष्करी अधिकाऱ्याऱ्यांनी केली आहे.
अशा प्रकारची निदर्शने रोखण्यासाठी लष्कराची शक्त्ती वाया घालवू नका, असे या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. बांगलादेशच्या लष्कराने कधीही आपल्याच नागरिकांवर बंदुका रोखल्या नाहीत आणि त्यांना असे प्रशिक्षणही दिलेले नाही, असे माजी लष्करप्रमुख इकबाल भुयान म्हणाले.
यापूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भडकला होता हिंसाचार
काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी हिंसा भडकली होती. त्यात २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. शेकडो भारतीय विद्यार्थी तेथून भारतात परतले होते. सरकारने विविध श्रेणीतील ५६ टक्के आरक्षण रद्द केले होते. हा निर्णय तेथील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता.
पुन्हा उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशातील भारतीय नागरिकांना उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्कात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी उच्चायुक्त कार्यालयाने एक संपर्क क्रमांक जारी केला आहे.
विद्यापीठात जाळपोळ
बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय विद्यापीठात काही अज्ञात लोकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली. रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांची तोडफोडदेखील करण्यात आली. १३ जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला आहे. सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप. मेसेंजर यासह सर्व सोशल मीडियावर तत्काळ बंदी घातली आहे.
ते दहशतवादी : पीएम
मोबाइल सेवादेखील सरकारने खंडित केली आहे. शेख हसीना यांनी हिंसाचारानंतर सुरक्षेसंदर्भात बैठक बोलाविली. त्यात तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, पोलीस तसेच इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. आंदोलन करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत, असे हसीना म्हणाल्या.