शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; आधी युकेने नकार दिला, आता अमेरिकेने व्हिसा रद्द केला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 07:41 PM2024-08-06T19:41:11+5:302024-08-06T19:41:50+5:30
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे.
Bangladesh Sheikh Hasina : बांग्लादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला. सध्या त्या भारतातील हिंडन विमानतळावरील गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. शेख हसीना काही काळ भारतात राहून लंडनला रवाना होतील, असे सर्वांना वाटले होते, मात्र युकेने त्यांना आश्रय देण्याबाबात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तर, दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा यूएस व्हिसा रद्द केला आहे. म्हणजेच, आता त्यांना अमेरिकेतही जाता येणार नाही.
युकेने काय म्हटले?
ब्रिटनच्या गृहविभागाच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना ज्या देशात आधी पोहचतील, त्या देशाकडे आश्रयासाठी बोलणे केले पाहिजे. सुरक्षेचा हा सर्वात वेगवान मार्ग असल्याचे ब्रिटनचे मत आहे. या कारणास्तव हसना यांची यूकेमध्ये आश्रयाची विनंती अद्याप प्रलंबित आहे. मात्र, हसीना यांची बहीण रेहाना आणि भाची ट्युलिप सिद्दीकी यांच्याकडे युकेचे नागरिकत्व असल्यामुळे त्यांना आश्रय मिळू शकतो.
अमेरिकेने व्हिसा रद्द केला
दरम्यान, शेख हसीना यांच्यासमोर युकेनंतर अमेरिकेला जाण्याचा पर्याय होता, मात्र अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. म्हणजेच, आता अमेरिकेत आश्रय घेण्याचा मार्गही बंद झाला आहे. असे मानले जाते की, त्यांच्या कार्यकाळात बांग्लादेश आणि अमेरिकेतील संबंध चांगले नव्हते, त्यामुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, लंडनला जाण्यासाठी शेख हसीना ब्रिटीश अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.
शेख हसीना आणखी काही दिवस भारतात राहणार
शेख हसीना आणखी काही दिवस भारतात राहणार आहेत. यावर भारत सरकारनेही स्पष्टोक्ती दिली आहे. शेख हसीना यांना भारतात राहायचे असेल, तर राहू शकतात, त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा. भारत सरकारने त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सध्या भारत सरकार बांग्लादेशचे लष्करप्रमुख आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहे. भारतीय उच्चायुक्त आणि भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही भारताची प्राथमिकता आहे. याशिवाय भारत सरकारने बांग्लादेशी सुरक्षा दलांना बांगलादेशातील हिंदूंवर होणारे हल्ले रोखण्यास सांगितले आहे.