बांगलादेशच्या राजधानीत देशभरातील विद्यार्थ्यांची निदर्शने, युनूस सरकारकडे केली 'ही' मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:22 IST2024-12-31T18:19:46+5:302024-12-31T18:22:08+5:30
Bangladesh Violence Students Protest : जुलैच्या विद्यार्थी निदर्शनांदरम्यान मारल्या गेलेल्यांना न्याय देण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी केली जोरदार घोषणाबाजी

बांगलादेशच्या राजधानीत देशभरातील विद्यार्थ्यांची निदर्शने, युनूस सरकारकडे केली 'ही' मागणी
Bangladesh Violence Students Protest : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे संकेत दिसत आहेत. राजधानी ढाका येथे सुरू असलेल्या 'मार्च फॉर युनिटी' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून विद्यार्थी सेंट्रल शहीद मिनारवर पोहोचले आहेत. हा कार्यक्रम भेदभाव विरोधी स्टुडंट मूव्हमेंट - Anti-Discrimination Students Movement (ADSM) ग्रुपने आयोजित केला आहे. ढाका युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या दिशेने मोर्चा काढत विद्यार्थी जुलैच्या निदर्शनांदरम्यान मारल्या गेलेल्यांना न्याय देण्याची मागणी करत आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. गेल्या वेळी आंदोलनात शेकडो लोक मारले गेले होते, मात्र त्यांचे मारेकरी मोकाट का?, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
देशभरातून शहीद मिनारवर पोहोचले विद्यार्थी
विद्यार्थ्यांच्या संबंधीच्या कार्यक्रमाची घोषणा उशिरा झाल्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना येण्यास उशीर होत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळपासूनच खागराछरी, बंदरबन, नाटोर, नौगाव, पंचगडसह अनेक जिल्ह्यांतून विद्यार्थी वाहनांतून शहीद मिनारवर पोहोचले. मंगळवारी राजधानीतील रुपायण टॉवर येथे पत्रकार परिषदेत ADSM ग्रुपने 'मार्च फॉर युनिटी'ची घोषणा केली होती. हजारो हुतात्म्यांचे बलिदान ओळखून जनतेच्या आकांक्षांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी जुलै क्रांतीची घोषणा आवश्यक आहे, असे विद्यार्थी चळवळ गटाचे सचिव आरिफ सोहेल यांनी लेखी भाषणात सांगितले. ADSM नेत्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलना दरम्यान जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या बसेसना ढाका विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश दिला जाईल, तर उर्वरित बसेसना शेर-ए-बांगला नगरमधील जुन्या व्यापार मेळा मैदानात प्रवेश दिला जाईल.
शहीद मिनार येथे 'मार्च फॉर युनिटी' कार्यक्रम
मंगळवारी सकाळी शहीद मिनार परिसरात कार्यक्रमाची अंतिम तयारी दिसून आली. सकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच जुलै महिन्याच्या आंदोलनावर आधारित माहितीपट दाखवण्यात येणार असून, त्यासाठी आयोजकांनी ठिकठिकाणी मोठे स्क्रीन लावले.