बांगलादेशी मिशनवर हल्ल्याप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांना समन्स, ढाका येथे झाली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 07:22 PM2024-12-03T19:22:13+5:302024-12-03T19:23:09+5:30

परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

Bangladesh summons Indian envoy amid tensions over Agartala Consulate breach | बांगलादेशी मिशनवर हल्ल्याप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांना समन्स, ढाका येथे झाली चौकशी

बांगलादेशी मिशनवर हल्ल्याप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांना समन्स, ढाका येथे झाली चौकशी

Agartala Consulate breach : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या संदर्भात आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालया जवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी उच्चायुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तोडफोड केली. या प्रकरणी मंगळवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

भारतीय उच्चायुक्त काय म्हणाले?

भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील व्यापक संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले की, ही भेट कोणत्याही एका मुद्द्यापुरती मर्यादित ठेवता येणार नाही. आम्हाला दोन्ही देशातील सकारात्मक, स्थिर, विधायक नातेसंबंध पुढे न्यायचे आहेत. आम्ही अनेक बाबींमध्ये एकमेकांवर अवलंबून आहोत आणि आमच्या सहकार्याचा दोन्ही देशांच्या लोकांना फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे. गेल्या काही महिन्यांत दोन देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक विकास झाला आहे. व्यापार असो, वीज पारेषण असो किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असो, आम्ही बरीच सकारात्मक गती राखली आहे. आम्ही बांग्लादेशच्या अंतरिम सरकारशी संलग्न कारभार करण्यास तयार आहोत आणि शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहोत.

सात जणांना अटक, तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबित

दुसरीकडे, आगरतळा येथील बांगलादेशी मिशनवर झालेल्या कथित हल्ल्याच्या अवघ्या काही तासांनंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात या घटनेचा निषेध केला. या हल्ल्याचे वर्णन 'अत्यंत खेदजनक' असे केले. कोणत्याही परिस्थितीत, राजकीय आणि वाणिज्य दूतांच्या मालमत्तांना लक्ष्य केले जाऊ नये, असा पुनरुच्चार करण्यात आला. MEA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकार नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालय आणि देशातील त्यांच्या उप/सहाय्यक उच्चायुक्तांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी कारवाई करत आहे. दरम्यान, आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात कथित तोडफोड आणि बांगलादेशी राष्ट्रध्वज जबरदस्तीने काढून टाकल्याप्रकरणी सोमवारी सात जणांना अटक करण्यात आली, तर सरकारने या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही केले.

 

Web Title: Bangladesh summons Indian envoy amid tensions over Agartala Consulate breach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.