“कॅनडापेक्षा भारत भक्कम”; जपान, श्रीलंकेनंतर आता बांगलादेशचे समर्थन, ट्रुडोंना सुनावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 02:49 PM2023-09-26T14:49:11+5:302023-09-26T14:50:47+5:30
Canada-INDIA Crisis: भारताचा आम्हाला अभिमान आहे. आमचा भारताला पाठिंबा आहे, असे बांगलादेशने म्हटले आहे.
Canada-INDIA Crisis: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या मृत्यूमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. अमेरिकेने कॅनडाची बाजू घेत भारताने तपासात सहकार्य करावे. भारताला कोणतीही सूट मिळणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. मात्र, यानंतर जपान, श्रीलंका यांसारख्या देशांनी भारताची बाजू घेत कॅनडाला चांगलेच सुनावले. एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अमेरिकेलाच घरचा आहेर देत, अमेरिकेची भूमिका योग्य नसल्याचे म्हटले. यानंतर आता बांगलादेशने भारताचे समर्थन करत भारत हा कॅनडापेक्षा वरचढ असल्याचे म्हटले आहे.
न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेल्या श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या तणावावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'काही दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय मिळाला आहे. कॅनडाने कुठलाही पुरावा नसताना काही भडक आरोप केले आहेत. त्यांनी श्रीलंकेसंदर्भात असेच केले, असे श्रीलंकेने म्हटले आहे. यानंतर आता बांगलादेशने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
कॅनडापेक्षा भारतच वरचढ
भारत आणि कॅनडा संघर्षावर बांगलादेशकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की, कॅनडापेक्षा भारतच वरचढ आणि भक्कम आहे. भारताचा आम्हाला अभिमान आहे. भारत अपरिपक्व गोष्टी करत नाही. आम्ही भारताच्या बाजूने आहोत, या शब्दांत अप्रत्यक्षरित्या जस्टिन ट्रुडो यांना फटकारल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून कॅनडासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची भूमिका अधिक कठोर झाली आहे. खलिस्तानी दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकारने उघडपणे दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारच्या विनंतीवरून इंटरपोलने सोमवारी प्रतिबंधित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य करणवीर सिंग याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.