बांग्लादेशात पुन्हा सत्तापालट होणार? लष्करप्रमुखांचे सैनिकांना ढाक्यात येण्याचे आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:44 IST2025-03-22T14:44:24+5:302025-03-22T14:44:52+5:30
Bangladesh Unrest: बांग्लादेशात नवी सरकार आले, पण अद्याप परिस्थिती सुधारली नाही.

बांग्लादेशात पुन्हा सत्तापालट होणार? लष्करप्रमुखांचे सैनिकांना ढाक्यात येण्याचे आदेश!
Bangladesh Unrest: काही महिन्यांपूर्वी हिंसक संघर्षानंतर बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकण्यात आले. हसीना यांना सत्तेवरुन हटवल्यानंतर मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे प्रमुख बनले. नवीन सरकार आल्यानंतर देशातील परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षा होती, मात्र आता परिस्थिती आणखी बिघडताना दिसत आहे. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे. बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांनी आपल्या सर्व सैनिकांना राजधानी ढाका येथे एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत.
नॉर्थ-ईस्ट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बांग्लादेश लष्कराने शुक्रवारी लष्करी वाहने आणि प्रत्येक ब्रिगेडमधील 100 सैनिकांना ढाका गाठण्याचे निर्देश दिले. हा आदेश का देण्यात आला हे स्पष्ट झालेले नाही, मात्र गेल्या काही आठवड्यातील घटना पाहिल्यास हा आदेश काही मोठ्या घटनेची चिन्हे असू शकतात.
लष्कराचा आदेश या दोन घटनांशी संबंधित?
अलीकडेच अशा दोन घटना घडल्या आहेत, ज्यामुळे लष्कराने हे पाऊल उचलले असावे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थी नेता आणि ग्रामीण विकास आणि सहकार मंत्रालयाचा सल्लागार आसिफ महमूद शाजिब भुईया याचा एक जुना व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो असा दावा करताना दिसतो की, लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी मोहम्मद युनूसकडे बांग्लादेशची सत्ता सोपवण्यास अनिच्छेने सहमती दर्शवली होती.
यापूर्वी, आणखी एक विद्यार्थी नेता हसनत अब्दुल्ला याने 11 मार्च रोजी जनरल जमान यांच्याशी गुप्त बैठकीनंतर लष्कराविरोधात आंदोलन छेडण्याची जाहीर धमकी दिली होती. कारण लष्करप्रमुखांनी शेख हसीना यांचा पक्ष 'अवामी लीग' बांग्लादेशच्या राजकारणात परत येण्याबाबत आणि निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केले होते. या दोन घटना पाहता, बांग्लादेशात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे आहेत.
लष्करप्रमुखांनी हे पाऊल का उचलले?
लष्करप्रमुख आणि सध्या बांग्लादेशात सत्ता गाजवणारे नेते यांच्यात सर्व काही सुरळीत दिसत नाही. बांग्लादेशातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्करप्रमुख युनूस प्रशासनाला सातत्याने इशारा देत असल्याचे अनेक वृत्तांतून समोर आले आहे. अशा स्थितीत लष्करप्रमुख पुन्हा एकदा शेख हसीना यांच्या अवामी लीगचा मार्ग मोकळा करत असल्याची भीती विद्यार्थी नेत्यांना आहे. यामुळेच सध्या बांग्लादेशची धुरा सांभाळणारे लोक लष्कराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन लष्करप्रमुखांनी आतापासूनच कोणत्याही मोठ्या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. ढाका येथे सैन्य जमा करण्याच्या आदेशाकडे या तयारीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.