शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 04:05 PM2024-08-10T16:05:34+5:302024-08-10T16:06:05+5:30

हिंसक आंदोलनानंतर बांगलादेशात सत्तापालट झाली असून त्याठिकाणी लष्कराच्या राजवटीत अंतरिम सरकार देशात बनलं आहे. 

Bangladesh Violence: 2 student leaders who protested against Sheikh Hasina were made ministers | शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री

शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री

ढाका - बांगलादेशात मागील काही महिन्यांपासून हिंसा आणि अराजकता माजली असून देशात सत्तापालट झाली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. युनूस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये १६ सदस्यीय सल्लागार परिषदेची घोषणा करण्यात आली आहे. त्यात विविध क्षेत्रातील लोकांची निवड करण्यात आली आहे. 

युनूस यांच्या कॅबिनेटमधील सर्वात जास्त चर्चा २ नावांची सुरु आहे. नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद अशी ही नावे आहे. नाहिद आणि आसिफ हे दोघे विद्यार्थी नेते आहेत. अलीकडच्या काळात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे हे नेतृत्व करत होते. याच आंदोलनामुळे शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हायला भाग पाडलं. देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ग्रुप स्टूडेंट अगेंस्ट डिस्क्रिमिनेशनचे आसिफ आणि नाहिद यांना नव्या कॅबिनेटमध्ये संधी मिळाली आहे. 

नाहिद इस्लाम देशाच्या दूरसंचार मंत्रालयाचे प्रमुख असतील. २६ वर्षीय समाजशास्त्रातील पदवीधर नाहिद इस्लाम विद्यार्थी आंदोलनात पुढे होते. त्यांना पोलिसांनी अटक केली होती. आसिफ महमूद यांच्याकडे युवक आणि क्रिडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. २५ वर्षीय आसिफ सायन्समधून पदवीधर आहे. आसिफ आणि नाहिद हे विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनले होते. त्यामुळे अंतरिम सरकार देशात येताच या दोघांना मोठी संधी मिळाली आहे.

युनूस यांनी स्वत:कडे ठेवले २७ मंत्रालय

अंतरिम सरकारचं नेतृत्व करणाऱ्या मोहम्मद युनूस यांनी त्यांच्याजवळ २७ मंत्रालय ठेवले आहेत. त्यात संरक्षण, माहिती प्रसारण, शिक्षण, ऊर्जा, खाद्य, जलसंधारणसारखे महत्त्वाचे विभाग आहेत. दुसऱ्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी माजी सचिव एम तौहिद हुसैन यांना परराष्ट्र खाते सोपवले आहे. निवृत्त ब्रिगेडियर जनरल सखावत हुसैन यांच्याकडे गृह मंत्रालय आहे. हुसैन २००७ ते २०१२ पर्यंत देशात निवडणूक आयुक्त होते. प्रोफेसर आसिफ नजरुल यांच्याकडे कायदा मंत्रालयाची जबाबदारी आहे. नजरुल यांनी उघडपणे विद्यार्थी आंदोलनाला समर्थन दिले होते.

बांगलादेशात शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता न्यायाधीशांना हटवण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांनी मुख्य सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करत सुप्रीम कोर्टाला घेराव घातला. त्यानंतर हे पद सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यात विद्यार्थी नेत्यांचं म्हणणं आहे की, शेख हसीना या देशात परतल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात झालेल्या हत्यांबद्दल त्यांच्यावर खटला चालवावा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जवळपास ३०० लोक मारले गेले. त्यांच्या मृत्यूला शेख हसीना यांना जबाबदार धरलं जावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
 

Web Title: Bangladesh Violence: 2 student leaders who protested against Sheikh Hasina were made ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.