PM शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी; बांग्लादेशातील हिंसाचारात आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 09:04 PM2024-08-04T21:04:56+5:302024-08-04T21:09:33+5:30
सध्या देशभरात कर्फ्यू लागू असून, इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
Bangladesh Protest : बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू झालेले आंदोलन आता सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीवर येऊन ठेपले आहे. काही दिवसांपूर्वी शांत झालेल्या आंदोलनाने आज पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये रविवारी(दि.4) हिंसक झटापट झाली. यात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो जखमी आहेत. मृतांमध्ये सामान्य नागरिकांसह पोलिसांचाही समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी देशातील विद्यार्थ्यांनी आरक्षणाविरोधात आंदोलन केले होते. तर, आता सरकारी धोरणे आणि शेख हसीना यांचा राजीनामा आणि मागील आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या निदर्शनांदरम्यान अनेक ठिकाणांहून हिंसाचाराच्या बातम्याही आल्या आहेत. दरम्यान, देशात पुन्हा एकदा सरकारविरोधी आंदोलन सुरू झाल्यानंतर गृह मंत्रालयाने देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान, आंदोलनात झालेल्या मृत्यूची चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असे पंतप्रधान शेख हसीना यांनी स्पष्ट केले आहे.
बांग्लादेशात गेल्या महिन्यात आरक्षणाविरोधात निदर्शने झाली होती. निदर्शने सुरुवातीला शांततापूर्ण होती, परंतु 15 जुलै रोजी ढाका विद्यापीठात विद्यार्थी आणि पोलिस यांच्यातील संघर्षानंतर याला हिंसक वळण मिळाले. 21 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सरकारने हा कोटा 30 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला, मात्र तरीही हिंसाचार आणि निदर्शने थांबले नाहीत. या आंदोलनात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत.
इंटरनेट, शाळा आणि विद्यापीठे बंद
हिंसाचार भडकल्यानंतर सरकारने देशातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. याशिवाय देशातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. बांग्लादेश पोलिसांनी आतापर्यंत 11 हजार लोकांना अटक केली आहे.