बांगलादेशी सैन्याला कशाची भीती सतावतेय?; गोंधळात जारी केला मोठा आदेश, लोक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:16 PM2024-08-08T20:16:13+5:302024-08-08T20:18:25+5:30

बांगलादेशात मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाने रौद्र रुप धारण केले. आंदोलनकर्ते थेट पंतप्रधान निवासस्थानी घुसले. त्यामुळे तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. 

Bangladesh violence - Army allows Central Bank of Bangladesh to allow account holders to withdraw only 1 lakh taka | बांगलादेशी सैन्याला कशाची भीती सतावतेय?; गोंधळात जारी केला मोठा आदेश, लोक त्रस्त

बांगलादेशी सैन्याला कशाची भीती सतावतेय?; गोंधळात जारी केला मोठा आदेश, लोक त्रस्त

ढाका - शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून ३ दिवस उलटले तरी तिथं अद्यापही शांतता प्रस्थापित झाली नाही. बांगलादेशात हिंदूवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशातील बिघडलेली कायदा व्यवस्था पाहता सैन्यानं बँकिंग सिस्टमबाबत मोठा आदेश जारी केला आहे. सैन्याच्या आदेशावर बांगलादेशच्या सेंट्रल बँकेने कुठल्याही बँक खात्यातून दिवसाला १ लाख टकाहून अधिक रोकड काढण्यावर निर्बंध आणले आहेत. 

सेंट्रल बँक ऑफ बांगलादेशाने बुधवारी रात्री हे आदेश देशातील सर्व बँकांना दिलेत. देशातील कुठल्याही बँकेला खातेदारांच्या खात्यातले १ लाख टकाहून अधिक रोकड देण्याची परवानगी नाही. रोखीवर मर्यादा असली तरी बँक खातेधारक कुठलीही रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकतो. डिजिटल व्यवहारांवर कुठलीही बंदी नाही. केवळ १ लाख टकापर्यंत रोकड काढण्याची परवानगी आहे. सध्या हा आदेश १ दिवसांसाठी लागू असला तरी यात वाढ होणार की नाही याबाबत ठोस माहिती नाही.

का उचललं हे मोठं पाऊल?

अखेर बांगलादेशी सैन्याला असा आदेश पारित करण्याची गरज का वाटली? बँकांमध्ये रोकड काढण्याची रांगही नाही. मग रोख रक्कम काढण्यावर निर्बंध का आणले गेले यामागे सर्वात मोठे कारण आहे. सूत्रांनुसार, बांगलादेशातील सर्व मोठ्या शहरातील पोलीस व्यवस्था मागील ३ दिवसांपासून ढासळली आहे. हिंसक आंदोलनामुळे पोलीस ठाण्यात मोजकेच कर्मचारी आहेत. रस्त्यावरही फारसे सुरक्षा जवान नाहीत. अशावेळी लूटीच्या घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं बोलले जाते. 

दरम्यान, बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबूर रेहमान यांचा पुतळा आंदोलकांनी तोडला आहे. बांगलादेशासाठी शेख मुजीबूर रेहमान यांनी सशस्त्र लढा दिला होता. त्यामुळे बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून बांगलादेशातील टका चलनावरही शेख मुजीबुर रेहमान यांचा फोटो आहे. आता नवीन सरकार आल्यानंतर नोटा बदलणार का असा प्रश्न विचारला जात आहे. 
 

Web Title: Bangladesh violence - Army allows Central Bank of Bangladesh to allow account holders to withdraw only 1 lakh taka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.