बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:33 PM2024-08-06T17:33:20+5:302024-08-06T17:34:06+5:30

भारताचा शेजारील बांग्लादेश हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे.

Bangladesh Violence Fire of Bangladesh Movement Reaches New York; Protesters entered the Bangladeshi embassy | बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले...

बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले...


Bangladesh Violence : गेल्या अनेक महिन्यांपासून बांग्लादेशात सरकारविरोधी आंदोलन सुरू होते. हळुहळू या आंदोलनाचे रुपांतर हिंसाचारात झाले, ज्यामुळे शेक हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन करावे लागले. देशातील नागरिकांमध्ये हसीना यांच्या कुटुंबाबद्दल प्रचंड राग भरला आहे. याचे पडसाद अमेरिकेतही उमटले आहेत. आंदोलकांनी न्यूयॉर्कमधील बांग्लादेश वाणिज्य दूतावासात घुसून माजी राष्ट्रपती आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो काढून टाकला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये आंदोलक वाणिज्य दूतावासात घुसून बांग्लादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आंदोलकांनी बांगलादेशच्या ध्वजाच्या रंगांच्या टोप्या घातल्याचे दिसत आहे. या आंदोलकांसमोर दूतावासातील अधिकारी हतबल दिसतात. अधिकारी हात जोडून शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हिंसाचारग्रस्त देशापासून दूर असलेल्या अमेरिकेत ही घटना का घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान, बांग्लादेशातील आंदोलकांच्या मनात शेख हसीना यांच्या कुटुंबाविषयी इतका राग भरला आहे की, त्यांनी सोमवारी शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा पाडला. याशिवाय काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत संसद भवनावरही घुसून मालमत्तेची लूट आणि तोडफोड केली. शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानात आंदोलक घुसल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशात हिंदूंच्या घरांवर, व्यवसायांवर आणि मंदिरांवर हल्ले केले जात आहेत. 27 जिल्ह्यांमध्ये या घटना घडत आहेत. मेहेरपूरमध्ये एका मंदिरावर जमावाने हल्ला केला. याशिवाय इस्कॉन मंदिरावरही जमावाने हल्ला केल्याचे वृत्त आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली
मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशातील परिस्थितीवर राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. बांग्लादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथील अल्पसंख्याक समुदाय हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली. 

 

Web Title: Bangladesh Violence Fire of Bangladesh Movement Reaches New York; Protesters entered the Bangladeshi embassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.