फेसबुकवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी आगीत तेल ओतलं; बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी आरोपींची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:24 PM2021-10-25T17:24:40+5:302021-10-25T17:26:02+5:30
बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरोधात झालेला हिंसाचार (Bangladesh Violence) आणि सोशल मीडियात धार्मिक द्वेष निर्माण केल्याच्या आरोपाप्रकरणी एका मुख्य संशयित व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती.
बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरोधात झालेला हिंसाचार (Bangladesh Violence) आणि सोशल मीडियात धार्मिक द्वेष निर्माण केल्याच्या आरोपाप्रकरणी एका मुख्य संशयित व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती. या दोघांनीही आता त्यांच्यावरील आरोपांची कबुली दिली आहे. आपण केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे १७ ऑक्टोबर रोजी दुर्गा पुजेवेळी पीरगंज जिल्ह्यातील रंगपूर येथे हिंसा भडकली होती, असा कबुलीनामा आरोपी शैकत मंडल यानं कोर्टासमोर दिला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे. शैकत मंडल याचा साथीदार रबीउल इस्लाम (३६) एक मौलवी आहे आणि त्याच्याविरोधात हिंसा भडकवणं आणि लूटमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
"शैकल मंडल आणि त्याचा साथीदार रबीउल इस्लाम यांनी रंगपूरच्या कोर्टात हिंसाचार उफळण्यामागची त्यांची भूमिका मान्य केली आहे", असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. बीडीन्यूज २४ डॉट कॉमनं शीघ्र कृती दलाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही आरोपींनी फेसबुकवरील आपले फॉलोअर्स वाढविण्याच्या हेतूनं आपत्तीजनक माहिती फेसबुकवर पोस्ट केली होती अशी कबुली दिली आहे.
६८३ जणांना आतापर्यंत अटक
एका लाउडस्पीकरवर घोषणा करुन गावातील मुस्लिमांची माथी भडकवण्याच्या कामात इस्लाम यानं मंडल याची मदत केली. पीरगंजमध्ये एका अफवेमुळेच हिंसा भडकली असा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी अहवालात केला आहे. एका हिंदू व्यक्तीनं धार्मिक तेढ निर्माण करणारा आपत्तीजनक मजकूर फेसबुकवर अपलोड केला होता. १७ ऑक्टोबर रोजी यावरुनच मोठा हिंसाचार झाला आणि ७० हिंदूंची घरं पेटविण्यात आली. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार याप्रकरणी आतापर्यंत ७ जणांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. हिंसाचारासंबंधी एकूण २४ हजार जणांवर आरोप करण्यात आला आहे. तर आतापर्यंत ६८३ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत ७० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
बांगलादेशातील कोमिल्ला येथील दुर्गापूजेच्या पेंडालवर झालेल्या हल्ल्यानंतर, रविवारी रंगपूरच्या पीरगंजमध्ये हिंदूंची घरे जाळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. काही कट्टर धर्मांधांनी हिंदूंची 20 घरे जाळली आहेत. मात्र, स्थानिक संघ परिषदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, या धर्मांधांनी तब्बल 65 घरांना आग लावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरणही सोशल मीडिया पोस्टशी संबंधित आहे आणि एका हिंदू युवकाच्या फेसबूकवरील आक्षेपार्ह पोस्टनंतर हा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित युवकाला सुरक्षा देत त्याचे घर तर वाचवले. पण धर्मांध हल्लेखोरांनी त्याच लोकेशनच्या जवळपासची घरे जाळली. याप्रकरणी ढाका ट्रिब्यूनचे अध्यक्ष मोहम्मद सादकुल इस्लाम यांच्यानुसार, हल्लेखोर जमात-ए-इस्लामी आणि विद्यार्थी संघटना इस्लामिक विद्यार्थी शिबिराच्या स्थानिक युनिटशी संबंधित होते.