बांगलादेशमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार, वंगबंधूंच्या घराची नासधूस, अल्पसंख्याक हिंदूंवरही हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:28 IST2025-02-06T08:14:49+5:302025-02-06T08:28:35+5:30
Bangladesh Violence Update: काही दिवस शांततेत गेल्यानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या अवामी लीग या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले.

बांगलादेशमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार, वंगबंधूंच्या घराची नासधूस, अल्पसंख्याक हिंदूंवरही हल्ले
काही दिवस शांततेत गेल्यानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या अवामी लीग या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले. बुधवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ८ वाजता दंगेखोरांच्या जमावाने ढाका येथील धानमंडी परिसरात असलेल्या घर क्र. ३२ वर हल्ला केला. तिथे खूप मोडतोड केली. यादरम्यान प्रवेशद्वारावर लावलेले शेख मुजिबूर रहमान यांचे फोटो फाडण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी शेख हसिना यांना फाशी द्या, अशा आक्रमक घोषणा दिल्या.
या हिंसाचाराचं नेतृत्व स्टुडंट मुव्हमेंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन नावाच्या संघटनेशी संबंधित नेते करत होते. त्यांनीच शेख हसिना यांना सत्ता सोडून देशाबाहेर जाण्यास भाग पाडले होते. शेख हसिना यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करण्याचा निर्णय घेतल्याने हे आंदोलक संतापले होते. तसेच शेख हसिना यांनी काही वक्तव्य केलं तर धानमंडी येथील घर क्र. ३२ नष्ट केलं जाईल, असा इशारा या दंगेखोरांनी दिसा होता. हे घर शेख हसिन यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.
त्यानंतर या संघटनेच्या शेकडो विद्यार्थी आणि समर्थकांनी रात्री आठ वाजता धानमंडी येथील शेख हसिना यांच्या घरामध्ये घुसून तिथल्या संपत्तीची नासधूस केली. तसेच घराला आग लावली. हा सगळा हिंसाचार सुरू असताना स्थानिक पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेण्यात आली होती. तसेच दंगेखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी कुठलीही उपाययोजना केली नाही.
या हिंसाचारामध्ये सहभागी झालेले दंगेखोर अवामी लीगवर बंदी घालण्याची आणि शेख हसिना यांना फाशी देण्याची मागणी करत होते. त्यांनी अवामी लीगला बांगलादेशमधील कुठल्याही निवडणुकीत सहभागी होण्याची परवानगी देता येणार नाही, अशी धमकी दिली होती. तसेच हा हिंसाचार केवळ अवामी लीगच्या कार्यकर्त्यांपूरता मर्यादित राहिला नाही. तर संधी साधून काही कट्टरतावाद्यांनी अल्पसंख्याक हिंदूंवरही हल्ले केले.
कट्टरतावाद्यांच्या जमावाने बांगलादेशमधील राजशाही जिल्ह्यातील फुदकी पारा गावात असलेल्या हिंदूंच्या घरावर हल्ला केला. यादरम्यान सरस्वती देवीच्या एका मूर्तीची तोडफोड करण्यात आली. तर पोतुआखली जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून इति दास नावाच्या हिंदू मुलीने जीवन संपवले.
दरम्यान, बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून माजी पंतप्रधान शेख हसिना यांनी मोहम्मद युनूस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेख हसिना यांनी फुटीरतावादी शक्तींच्या राज्यात बांगलादेश एक दहशतवादी राष्ट्र बनला आहे. निर्दोष लोक आणि अल्पसंख्याकांना मारलं जात आहे. त्यांच्या मालमत्तेची जाळपोळ केली जात आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून लोकांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप केला.