"भारतानं बांगलादेशात हस्तक्षेप करावा, अन्यथा...", नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:48 PM2024-08-05T12:48:28+5:302024-08-05T12:50:45+5:30
Muhammad Yunus : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावर भारतानं दिलेल्या प्रतिक्रेयेवर मुहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बांगलादेशात सध्या ठिकठिकाणी हिंसाचार सुरु आहे. तसंच, पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात निदर्शनं सुरू आहेत. नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा समोर आलं आहे, त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ही निदर्शनं केली जात आहेत. दरम्यान, आता बांगलादेशी अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी याबाबत आपली व्यथा मांडली आहे.
बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावर भारतानं दिलेल्या प्रतिक्रियेवर मुहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, ही अशांतता शेजारील देशांमध्ये पसरू शकते, असा इशारा मुहम्मद युनूस यांनी दिला. मुहम्मद युनूस यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "भारत जेव्हा म्हणतो की, ही अंतर्गत बाब आहे, तेव्हा मला दु:ख वाटते. भावाच्या घरात आग लागली तर ती अंतर्गत बाब आहे, असं कसं म्हणायचं? मुत्सद्देगिरीला अंतर्गत बाब म्हणण्यापेक्षा अधिक समृद्ध शब्दसंग्रह आहे."
गेल्या महिन्यात भारतानं बांगलादेशातील नोकऱ्यांच्या आरक्षणाविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनावर भाष्य करण्यास नकार दिला होता. आम्ही हा बांगलादेशचा अंतर्गत मामला मानतो, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मुहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेशात अशांतता आहे, जिथं १७ कोटी लोक संघर्षात आहेत, तरुणांचे बळी जात आहेत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. त्यामुळे ही परिस्थिती केवळ बांगलादेशच्या सीमेपुरती मर्यादित राहणार नसून, शेजारील देशांवरही परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारताला बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आणि निवडणुकांमध्ये पारदर्शकता नसल्याची टीका मुहम्मद युनूस यांनी केली. तसंच, त्यांनी भारताच्या यशस्वी निवडणुकांचं कौतुक केलं आणि बांगलादेशमध्ये भारताचा पाठिंबा नसल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. या मुद्द्यांवर भारत सरकारशी चर्चा करण्याची योजना मुहम्मद युनूस यांनी आखली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात आरक्षणाविरोधात झालेल्या आंदोलनांमुळं पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
आतापर्यंत २८३ जणांचा मृत्यू
जुलैमध्ये निदर्शने सुरू झाल्यापासून आतापर्यंत हिंसाचारात एकूण मृत्यूची संख्या जवळपास २८३ वर पोहोचली आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं बांगलादेशमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, परराष्ट्र मंत्रालयानं पुढील आदेशापर्यंत बांगलादेशला न जाण्याचा सल्ला दिला आहे.