बांगलादेशी भारतात घुसतायत, रोहिंग्या बांगलादेशात; ड्रोन हल्ल्यात २०० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 09:17 AM2024-08-11T09:17:59+5:302024-08-11T09:18:13+5:30
म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे.
भारताचे शेजारी एकामागोमाग एक बेजार होत चालले आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये अराजकतेची स्थिती आहे. अशातच बांगलादेशात पंतप्रधानांना देश सोडून पळावे लागले आहे. बांगलादेशात हिंसाचार असल्याने हजारो बांगलादेशी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकजण घुसलेले आहेत. तर त्या बांगलादेशात म्यानमारचेरोहिंग्या घुसत आहेत.
म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्य महिला, लहान मुले आणि अनेक कुटुंबेच्या कुटुंबे असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सने याचे वृत्त दिले आहे. या ठिकाणी मृतदेहांचे ढिगारे असल्याचे व आपल्या नातेवाईकाला लोक शोधत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात सोमवारी हा ड्रोन हल्ला झाला आहे. बांगलादेशच्या सीमेवर घुसण्याच्या प्रयत्नात असताना हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यासाठी मिलिशिया आणि म्यानमार लष्कराने एकमेकांवर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चिखलाच्या जमिनीवर मृतदेहांचे ढीग विखुरलेले दिसत आहेत. या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी २०० चा आकडा सांगितला आहे.
रोहिंग्यांचा इतिहास...मुळचे बांगलादेशीच
रोहिंग्या मुस्लिम आणि म्यानमारचा बहुसंख्य बौद्ध समुदाय यांच्यातील वाद १९४८ मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे. अराकान या राज्यात १६ व्या शतकापासून मुस्लिम राहतात. या भागावर ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बांगलादेशातून अराकानमध्ये मजूर आणण्यास सुरुवात केली. यामुळे अराकानमधील मुस्लिम वस्ती वाढू लागली. या लोकांना रोहिंग्या म्हणून ओळखले जाऊ लागले. रोहिंग्यांची वाढती संख्या पाहून म्यानमारच्या जनरलने 1982 मध्ये बर्माचा राष्ट्रीय कायदा लागू केला. यानुसार त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. तेव्हापासून रोहिंग्या मुस्लिम ना बांगलादेशचे ना म्यानमारचे राहिले, ते अनेक देशांत स्थलांतरीत होत आहेत.